

चंद्रपूर : समाज माध्यमांवर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली. बल्लारपूर पोलिसांनी रविवारी (दि.८) ही कारवाई केली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर शुक्रवारी (दि.६) 'गोमाता के साथ दुष्कर्म का प्रयास' अशा मजकुरासह एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओवर बजरंग दल व इतर संघटनांनी तीव्र आक्षेप घेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली. प्रल्हाद भादू राठोड (वय ६५), विजय मोहन पाल (वय २२), शुभम सुधाकर खोब्रागडे (वय २९), हर्षद उर्फ गोलू रमेश घोटेकर (वय २७), विजय मधुकर ढोक (वय २६), पुरुषोत्तम ज्ञानबाजी सहारे (वय ४२), नरेश शिवा वर्मा (वय ३२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, पोलिस उपनिरीक्षक प्रेमशहा सयाम, संतोष दंडेवार, शरदचंद्र कारुष, भास्कर चिंचवलकर, सचिन राठोड यांनी केला. समाजमाध्यमांवर पोस्ट करताना सामाजिक जबाबदारीची जाण ठेवावी. कोणत्याही जाती, धर्म, किंवा समुदायाच्या भावना दुखावतील, अशा पोस्ट टाकू नयेत. अशा प्रकारची कोणतीही माहिती आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.