

चंद्रपूर: क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा आपल्या आवडत्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर आले आहेत. पत्नी अंजली तेंडुलकर आणि दोन जिवलग मित्रांसह ते शुक्रवारी सकाळी 10 वाजता ताडोबात दाखल झाले. दोन दिवसांचा त्यांचा हा दौरा खासगी स्वरूपाचा आहे.
मुंबईहून नागपूरमार्गे ते चिमूरजवळील बांबू रिसॉर्टमध्ये पोहोचले. छोटा आराम केल्यानंतर दुपारी 3 वाजता त्यांनी कोलारा कोअर झोनमध्ये पहिली सफारी केली. त्यांच्या सोबत मित्र जगदीश, नागपूरमधील आणखी एक मित्र आणि त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
सायंकाळी साडेसहा वाजता सचिन परत आले, मात्र पहिल्या सफारीत त्यांना एकाही वाघाचे दर्शन झाले नाही. त्यामुळे उद्याच्या सफारीबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे.
उद्या सकाळी आणि सायंकाळी ते दोन सफारी करतील, तर रविवारी सकाळची आणखी एक सफारी करून दुपारी नागपूरमार्गे मुंबईकडे प्रस्थान करतील.
सचिन तेंडुलकर दरवर्षी ताडोबाला भेट देत असून येथील वाघांविषयी त्यांना विशेष आकर्षण आहे. कोअर झोनमधील प्रसिद्ध छोटीतारा, बिजली, रोमा, मोगली, युवराज आणि बलराम यांच्या हालचालींबाबत ते नेहमीच रस घेतात. सध्या बिजली वाघिणीला तीन, तर रोमा वाघिणीला चार बछडे असून रोमा पर्यटकांना वारंवार दिसत असल्याने या परिसरात पर्यटनाला विशेष भर पडली आहे.
पहिल्या सफारीत वाघदर्शन न झाल्याने उद्याच्या दोन्ही सफारीकडे पर्यटकांसह स्थानिकांची उत्सुकता वाढली आहे. छोटी तारा, बिजली व रोमा यांच्या कोलारा परिसरातील हालचाली पाहता उद्याची सफारी रोमांचक ठरण्याची दाट शक्यता आहे.
ताडोबातील सचिनचा वार्षिक दौरा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. गेल्या वर्षी त्यांनी ताडोबातील एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता आणि भेटवस्तूही दिल्या होत्या. या दौऱ्यात ते परिसरातील काही गावांना भेट देणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.