Chandrapur News | सावकारी जाच व किडनी विक्री प्रकरणाची गंभीर दखल; रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांची मदत

जिल्हाधिकाऱ्यांना निधी वाटपाचे निर्देश : राज्यभर गाजलेल्या प्रकरणाला मदतीचा हात
Chandrapur News | सावकारी जाच व किडनी विक्री प्रकरणाची गंभीर दखल; रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांची मदत
Published on
Updated on

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन शिवदास कुळे यांच्या सावकारी जाच आणि किडनी विक्री प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना याबाबत अधिकृत पत्र पाठविण्यात आले असून, निधीची रक्कम थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, सावकारी जाचामुळे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या रोशन कुळे यांच्या परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक स्तरावर या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यानुसार रु. ५,००,००० (पाच लाख रुपये) इतके अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई शाखेतून ही रक्कम जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या नावे असलेल्या SBI  जटपुरा गेट शाखेतील खात्यात परस्पर वर्ग करण्यात आली आहे. आता जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक पडताळणी करून ही मदत रोशन कुळे यांच्यापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, संपूर्ण प्रकरणाची आवश्यक ती पडताळणी करावी, मंजूर निधीचा योग्य कारणासाठी विनियोग करण्यात यावा, निधी वितरित झाल्यानंतर त्याचे विनियोग प्रमाणपत्र शासनाकडे सादर करावे, रोशन कुळे यांना रक्कम प्राप्त झाल्यानंतर महसूल मुद्रांकित पावती सचिवालयास पाठवावी,निधीचा वापर न झाल्यास रक्कम तात्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यात परत वर्ग करावी आदी सूचना दिल्या आहेत.

हे अधिकृत पत्र (शरद घावटे) सह कक्ष प्रमुख तथा कक्ष अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. तसेच या पत्राची प्रत माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही पाठविण्यात आली आहे.

राज्यभर गाजलेल्या प्रकरणाला मदतीचा हात

रोशन कुळे यांनी सावकारी कर्जाच्या जाचामुळे किडनी विकावी लागल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले. या प्रकरणात सावकारांविरोधात गुन्हे दाखल झाले, काही आरोपींना अटक झाली, तसेच कथित आंतरराष्ट्रीय किडनी विक्री रॅकेटचाही तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आलेली ही मदत रोशन कुळे आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा दिलासा मानली जात आहे. दरम्यान, शासनाकडून रोशन कुळे यांची बळकावलेली शेती, ट्रॅक्टर, गहाण ठेवलेले सोने आणि सावकारांकडे गेलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठीही स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news