

चंद्रपूर : लाल मिरचीला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. पारंपारिक पिकाऐवजी शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत. परंतु खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची उत्पादक संकटात सापडले आहेत. सध्या भाव पडल्याने व तोड्याचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने लाल मिरची झाडालाच आहे. मिरचीचा तोडा करायचा की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात धानपिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे. परंतु परंपरागत काळापासून धानाचेच उत्पनादन घेत असल्याने शेतकरी नेहमीच संकटात सापडत आहे. पारंपारिक पिकाऐवजी नवनवीन पिकाचे लागवड करण्यास शेतकरी पुढे येत आहे. धानासह कापूस, सोयाबीन, मिरची व बागायती पिकांकडे शेतकरी वळला आहे. विशेष म्हणजे राजूरा, कोरपना, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी या परिसरात कापूस, सायोबीन, मिरची व बागायती पिकांची लागवड केली जात आहे. या वर्षात राजूरा, कोरपनासह जिल्ह्यात सुमारे बाराशे हेक्टरमध्ये मिरची पिकाची लागवड करण्यात आली आहे.
सध्या मिरचीचा एक तोडा संपला आहे तर दुसरा तोडा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातून लाल मिरचीची निर्यात नागपूरसह अन्य राज्यात होते. परंतु अचानक भाव पडल्याने मिरची उत्पादक संकटात सापडला आहे. पहिल्या तोड्यात लाल मिरचीला १० हजारापर्यंत भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिला तोडा आटोपून घेतला. त्यानंतर दुसऱ्या तोड्याची तयारी सुरू असताना अचानक भाव पडले. फक्त ५ ते ७ हजार भाव मिळत असल्याने मिरचीचा दुसरा तोडा करायचा कि नाही, असा प्रश्न मिरची उत्पादकांना पडला आहे.
लागवड केल्यानंतर इतर पिकांपेक्षा मिरचीची विशेष काळजी घेतली जाते. या पिकाला किडींचा जास्त धोका असतो. त्यापासून वाचविण्यासाठी शेतकरी महागडी औषधी खरेदी करून फवारणी करतात. बुरशीजन्य किडींचा धोका हा नेहमीच असल्याने शेतकरी विशेष काळजी घेत असतात. शिवाय हंगामभरही मशागत करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात यावर खर्च होतो. मिरचीच्या तुलनेत अन्य पिकांना भाव जास्त नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक हलाखीची होत आहे. त्यामुळेच शेतकरी मिरचीसारख्या नगदी पिकाकडे वळत आहे. मिरचीचा तोडा करण्याचा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे भाव पडल्याने लाल मिरचीचा तोडा करायची कि नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तोड्या अभावी शेतकऱ्यांच्या बागांमध्ये लाल मिरची झाडालाच दिसून येत आहे. पडलेल्या भावाने उसळी घेतली नाही तर लाल मिरची उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.