

चंद्रपूर : क्रिकेट व फुटबॉलसाठी प्रचलित असलेले रामबाग मैदान काही दिवसांपूर्वी नवीन जिल्हा परिषदेच्या इमारत बांधकामासाठी खोदण्यात आले होते. परिसरातील नागरिकांचा याला विरोध होता. त्यांनी ही बाब लोकप्रतिनिधीपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मैदानावर भलामोठा खड्डा खोदण्यात आला तरीही त्याची कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीतर्फे रविवार (दि.११) सकाळी ७ वाजता रामबाग मैदानावर खोदलेल्या खड्ड्यात महापंचायत भरविण्यात आली.
या महापंचायतीला शहरातील खेळाडू, युवक, विविध संघटना-संस्था व योगा ग्रुपचे प्रतिनिधी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. जवळपास ५०० नागरिकांनी या महापंचायत मध्ये सहभाग घेतला. महापंचायतीमध्ये एकूण ८ ठरावांचे वाचन यावेळी करण्यात आले व हातवर करून आवाजी मतदानाने त्या ठरावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या विषयाची गंभीर दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात समिती सदस्यांना पाचारण करून जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर हे मैदान पूर्ववत करण्याचे आश्वासन आ सुधीर मुनगंटीवार व आ किशोर जोरगेवार यांनी रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीला दिले. त्यामुळे हे आंदोलन थांबविण्यात आले.