

चंद्रपूर : ट्रकद्वारे वाहतूक करण्यात आलेल्या तेंदूपत्ताचा मोबदला व्यापाऱ्याकडून वसुल करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या बल्लापूर येथील पोलिस उपनिरीक्षकास ५० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. या घटनेमुळे पोलिस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. हुसेन शहा असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई सोमवारी (दि.१३) करण्यात आली.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचे लाकूड, बांबू, तेंदुपता माल कमिशन आकारून ट्रकद्वारे वाहतूक करण्याचे काम आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये तक्रारदार यांनी १९ लाख २ हजाराचा तेंदुपत्ता गडचिरोली जिल्हयातून चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथे पोहचविला होता. या वाहतुकीचे १९ लाख २ हजार रूपये व्यापाऱ्याकडून येणे बाकी होते. तीन-चार महिन्यांचा कालावधी होऊनही व्यापारी तेंदूपत्ता वाहतुकीचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात बल्लारपूर येथे लेखी तकार दाखल केली होती. या व्यापाऱ्याकडून वाहतुकीचे पैसे वसूल करून देण्यासाठी एकूण स्वकमेच्या वीस टक्के रक्कम म्हणजे सुमारे ३ लाख ८० हजार रूपयाची लाचेची पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी केली होती.
तक्रारदार यांच्या या व्यवहारात तडजाडीअंती त्यांना फक्त गुंतवलेली मुद्दल १६ लाख १५ हजार रूपये व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली. व्यापारी व तक्रारदार यांच्यामध्ये समहोता होऊन सदर प्रकरण त्यांनी आपसात मिटवलेले होते. तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला व्यापाऱ्याविरोधात दिलेला लेखी तक्रारअर्ज मागे घेत असल्याबाबत आरोपीने पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा यांना सांगितले असता त्यांनी तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी तक्रारदारास वारंवार फोन करून पैश्याची मागणी केली. तसेच वरिष्ठांकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारदाराने मानसिक त्रासाला वैतागुन ८ जानेवारीला चंद्रपूर येथील लाचलुचपत विभागात याप्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपतने याप्रकरणी पडताळणी करत तक्रारदार यांच्याकडून ५० हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा याला सापळा रचून ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरुकुले, सफी रमेश दुपारे, पो. हवा. हिवराज नेवारे, पो. हवा. अरूण हटवार, पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे,, पोशि वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदिप ताडाम, राकेश जांभुळकर, म.पो.शि. मेधा मोहुर्ले, पुष्या काचोले, चापोसि सतिश रिलाम, बापोशि संदीप कौरोसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.