

चंद्रपूर : बामणवाडा येथील नक्षत्र हॉलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल आणि पत्त्यांचे संच असा एकूण २ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.३१) रात्री करण्यात आली. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजुरा पोलीस ठाण्याचे पथक रात्री गस्तीवर असताना बामणवाडा येथील नक्षत्र हॉलमध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता हॉलमध्ये एका टेबलाभोवती बसून २० जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्वांची अंगझडती घेतली असता रोख ५८ हजार ३०० रुपये, अंदाजे २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे १२ मोबाईल फोन आणि ३०० रुपये किमतीचे पत्त्यांचे सहा संच असा एकूण २ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजनारायण ठाकूर, पोलीस अंमलदार आकाश पिपरे आणि राजीव दुबे यांनी कारवाईत सहभाग घेतला.