Operation Shodh | "ऑपरेशन शोध": चंद्रपूरात हरवलेली नाती पुन्हा आली एकत्र

चंद्रपूर पोलिसांच्या प्रयत्नातून ६० हरवलेल्‍या व्यक्तींना आणले कुंटुंबात परत :
Operation Shodh | "ऑपरेशन शोध": चंद्रपूरात  हरवलेली नाती पुन्हा आली एकत्र
Operation Shodh | "ऑपरेशन शोध": चंद्रपूरात हरवलेली नाती पुन्हा आली एकत्र
Published on
Updated on

चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून हरवलेली आणि बेपत्ता झालेली आपल्या माणसांची वाट पाहणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाची आणि समाधान दिसून आले आहे. यांचे कारण म्हणजे चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने 'ऑपरेशन शोध'च्या माध्यमातून हरवलेले, बेपत्ता झालेले आणि पळविलेले ६० महिला, पुरुष, मुले आणि मुली यांचा यशस्वी शोध लावला आहे.

राज्याच्या महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे अपर पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वात 'मिसिंग सेल' या स्वतंत्र यंत्रणेची स्थापना करण्यात आली.

Operation Shodh | "ऑपरेशन शोध": चंद्रपूरात  हरवलेली नाती पुन्हा आली एकत्र
चंद्रपूर हादरले! जमिनीच्या वादातून भावानेच भावाला गोळ्या घातल्या; दिवसाढवळ्या हत्याकांड

जिल्ह्यात ८ मिसिंग सेल स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक उपविभागात ७ आणि जिल्हास्तरावर १ असा एकूण ८ पथकांचा ताफा तयार करून, त्यामध्ये १ अधिकारी आणि ४ अंमलदार अशी टीमची रचना करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी हे या सेलचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

दिनांक २७ जुलै २०२५ ते ०६ ऑगस्ट २०२५ या अवघ्या १० दिवसांच्या कार्यकाळात, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून २४ पुरुष, २७ महिला, २ अल्पवयीन मुले आणि ७ अल्पवयीन मुली अशा एकूण ६० जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

विशेष बाब म्हणजे, यामध्ये सन २०२० आणि सन २०२२ पासून बेपत्ता असलेल्या दोन महिलांनाही शोधण्यात यश मिळाले आहे. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांसाठी केवळ दिलासादायकच नाही तर अविस्मरणीय ठरली आहे.

'ऑपरेशन शोध'
या उपक्रमाचं नावच 'ऑपरेशन शोध' असून, ते जितकं तांत्रिक दृष्ट्या कार्यक्षम आहे तितकंच माणुसकीच्या भावनेने परिपूर्ण आहे. या मोहिमेचा उद्देश फक्त हरवलेल्यांचा शोध घेणे नाही, तर विखुरलेली नाती पुन्हा एकत्र आणण्याचा आहे.
Operation Shodh | "ऑपरेशन शोध": चंद्रपूरात  हरवलेली नाती पुन्हा आली एकत्र
Missing Women : बेपत्ता महिलांचा शोध आता मिशन मोडवर!

काही प्रकरणांत पळवून नेलेले अल्पवयीन मुले व मुली, काही प्रकरणांत घरातील वादामुळे घर सोडून गेलेली मंडळी, तर काहीजण नोकरीच्या शोधात किंवा अन्य वैयक्तिक कारणांमुळे बेपत्ता झालेले होते. पोलीसांनी तांत्रिक साधने, परिसरातील माहिती, लोकसंपर्क व घरपोच तपासाच्या माध्यमातून ही कामगिरी यशस्वी केली. चंद्रपूरच्या बल्लारपूर परिसरातील एका १६ वर्षीय मुलीचा दोन वर्षांपासून थांगपत्ता नव्हता. तिच्या वडिलांनी अनेकदा पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले, मात्र यश हाती लागत नव्हते. 'ऑपरेशन शोध'च्या माध्यमातून पोलिसांनी ती मुलगी मुंबईत मिळवली आणि जेव्हा ती परत आली, तेव्हा तिच्या वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. त्या मिठीमध्ये दोन वर्षांचा दुरावा विरघळून गेला.

"प्रत्येक शोध मोहिम ही आम्हाला माणसांच्या भावना समजण्याची आणि त्यांच्यासोबत नातं जोडण्याची संधी देते. या उपक्रमामुळे पोलिस दलाबद्दल जनतेचा विश्वास वाढत आहे."

ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

या मोहिमेमुळे अनेक कुटुंबांनी पुन्हा संवाद साधायला सुरुवात केली आहे. समाजातील अनेक विभक्त कुटुंब पुन्हा एकत्र येत आहेत. एकमेकांविषयी गैरसमज दूर होत आहेत. ही मोहीम केवळ शोधापुरती मर्यादित न राहता समाजात एकजूट निर्माण करणारा आणि माणुसकीला उजाळा देणारा उपक्रम ठरत आहे. 'ऑपरेशन शोध' हा फक्त प्रशासनाचा उपक्रम नाही, तर माणसांमध्ये हरवलेली माणुसकी पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. चंद्रपूर पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता, तळमळ आणि चिकाटी ही इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायक ठरत आहे.

"हरवलेले लोक आणि त्यांचे नातेवाईक यांच्यातील अंतर कमी करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आम्ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पेलत नाही, तर समाजात भावनिक सुरक्षाही निर्माण करतो."

मुम्मका सुदर्शन, पोलिस अधिक्षक, चंद्रपूर यांचा संदेश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news