

चंद्रपूर : १ एप्रिल २०२५ पासून चंद्रपूर महानगरपालिकेने ॲम्बुलन्स,शव वाहिका, पाण्याचे टँकर इत्यादी मूलभूत सेवांच्या दरात मोठी वाढ केली. या दरवाढीने संतप्त झालेल्या जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात उपायुक्त मंगेश खवले यांच्या गाडीवर नोटा उधळून 'घे पैसा' आंदोलन करण्यात आले. आज १६ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या दरम्यान गांधी चौकातील मनपा इमारतीसमोर हे आंदोलन झाले.
शहराच्या हद्दीमध्ये यापूर्वी मनपाच्या ॲम्बुलन्सची सेवा निशुल्क होती. आता यासाठी ५०० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. मनपा हद्दीच्या बाहेर ॲम्बुलन्स व शव वाहिकेसाठी साठी २०० रुपये भाडे आकारण्यात येत होते. १ एप्रिल पासुन मनपा यासाठी २०० ऐवजी १००० रुपये म्हणजेच पाचपट भाडे आकारण्यात येणार आहे. खाजगी ॲम्बुलन्स व शव वाहिका चालक १५ किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल- डिझेलचा खर्च घेतात. मनपा ॲम्बुलन्ससाठी १० किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल व शव वाहिकेसाठी ८ किलोमीटर मागे एक लिटर डिझेल घेत असल्याने इंधनाचा खर्चही जास्त लागणार आहे.याचा मोठा फटका शहरातील तसेच आसपासच्या गोरगरीब व गरजू लोकांना बसणार आहे.
आयुक्त विपिन पालीवाल यांनी जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध आजपर्यंत अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्या. कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले. आमची लढाई ही चंद्रपूर शहरातील ४ लक्ष नागरिकांच्या हिताची लढाई आहे. पैशाच्या हव्यासापोटी मनपाच्या तिजोरीची लूट करणाऱ्या कोणत्याही घोटाळेबाज अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. आयुक्तांनी १०० तक्रारी केल्या व १०० गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. असे पप्पू देशमुख यांनी सांगितले.
चंद्रपूर शहराची दुर्दशा करणाऱ्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जनविकास सेना दर आठवड्याला एक घोटाळा उघडकीस आणणार आहे. सोबतच एक लक्ष स्वाक्षऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून पुराव्यासह सर्व घोटाळ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.