

Mother Daughter killed in Truck Bike Accident
चंद्रपूर : राजुरा–बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामाने आणखी दोन निरपराध जीवांचा बळी घेतला आहे. अज्ञात ट्रकच्या जोरदार धडकेत माय-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी ( दि. 9) घडली. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पेठ वॉर्ड, राजुरा येथील रहिवासी ज्योती बंडू रागीट (वय ४२) व त्यांची कन्या सेजल बंडू रागीट या दोघी (एम एच 34 बी एन 5538) या दुचाकीवरून राजुराहून बल्लारपूरकडे जात होत्या. दरम्यान, वर्धा नदीवरील पूल ओलांडल्यानंतर जलाराम बाप्पा मंदिराजवळ अज्ञात भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.