

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील कोडशी खू. येथील पैनगंगा नदी पात्रात एका बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता झालेल्या वनसडी गावातील सतीश मारोती चिकराम यांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. पुलाजवळ बेवारस अवस्थेत त्यांची दुचाकी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (दि. २२ जुलै) सायंकाळच्या सुमारास कोडशी खू येथील पैनगंगा नदीवरील पुलाजवळ एक दुचाकी बेवारस स्थितीत आढळली. स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती कोरपना पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दुचाकीची तपासणी केली असता, ती दुचाकी वनसडी येथील रहिवासी सतीश मारोती चिकराम यांची असल्याचे निष्पन्न झाले.
दुचाकी पुलावर उभी असतानाही आजूबाजूला कोणतेही सामान अथवा व्यक्ती आढळून आली नाही. त्यामुळे सदर व्यक्ती नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी चंद्रपूर येथून विशेष रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले असून, आज बुधवारी (दि. २३ जुलै) दिवसभर पैनगंगा नदीच्या विस्तृत परिसरात पोलीस, गोताखोर व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली.
अद्यापही संबंधित व्यक्तीचा कुठलाही ठोस पुरावा सापडलेला नाही. सतीश चिकराम हे मंगळवारी दुपारी घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता आहेत. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून, पुढील घडामोडींसाठी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.