चंद्रपूर : राजुरा शहरातील ओम साईमंगल कार्यालयासमोरील एका झोपडीतून नऊ लाख रुपये किमतीचा गांजा पकडण्यात आला आहे. ही कारवाई राजुरा पोलिसांनी शुक्रवारी केली. आझाद रामफल सिंग (वय 36 चुलकाना, ता.समलखा, जि. पानिपत, हरियाणा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरा पोलिस स्टेशनचे विशेष पथक पोलीस उपनिरीक्षक हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत गस्त घालीत होते. राजुरा शहरातील बल्लारशा मार्गावरील ओमसाईराम मंगल कार्यालय समोरील खुल्या जागेत असलेल्या झोपडीत राहणारा एक इसम हा गांजा बाळगून असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या झोपडीत जाऊन चौकशी केली असता, त्या ठिकाणी 89.72 किलो गांजा आढळुन आला. त्याची किंमत 8 लाख 97 हजार 200 आहे. संशयित आरोपी आझाद सिंग याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधिक्षक रीना जनबंधू, उप विभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, पांडुरंग हाके, भीष्मराज सोरते, नरेश उरकुडे, पोहवा किशोर तुमराम, राजनारायन ठाकूर, नूतन डोरलीकर, वेणू नूत्तलवार, तिरुपती जाधव, महेश बोलगोडवार, रामराम बिंगेवाड, योगेश पिदूरकर, अविनाश बांबोळे, आकाश पीपरे, यांनी कारवाई केली..