

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपूर येथून चिमुरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका संशयित आरोपीला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे दोन किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे. मोहम्मद वहीद अब्दुल रहीम (वय 45) गोविंदनगर मोमीनपुरा नागपूर असे संशयित आरोपीचे नाव आहे.
नागपूर येथून गांजा घेऊन चिमूरमध्ये तस्करीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका संशयित आरोपीविषयी चिमूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. सदर संशयित आरोपी हा बस स्थानक परिसरात गुंगीकारक औषधी घेऊन असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक संतोष बकाल यांच्या नेतृत्वात त्यांच्या सहकाऱ्यांनी बस स्थानक परिसरात सदर आरोपीची शोध मोहीम केली. संशयित आरोपी मोहम्मद वहीद अब्दुल रहीम (वय 45) गोविंदनगर मोमीनपुरा नागपूर याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळील बॅगमध्ये गुंगिकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ, गांजा सुमारे दोन किलो आढळून आला. घटनास्थळी गांजा रितसर जप्त करून संशयित आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष बाकल, स.पो.नि. निशांत फुलेकर, स.पो.नि. मल्हारी ताळीकोटे, पो.उपनि. दत्ताहरी जाधव, सहाय्यक फौजदार विलास निमगडे, सचिन खामणकर, भरत घोळवे, सचिन साठे, कुणाल दांडेकर, सोनु एलकुचेवार यांच्या पथकाने केली.