

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : प्राचीन काळापासून प्रसिध्द येथील आराध्य दैवत असलेल्या चंद्रपुरातील महाकाली मातेच्या यात्रेला आज (दि.३ ) पासून सुरूवात झाली. मातेच्या दर्शनाकरीता येणाऱ्या भाविक भक्तांना सोई सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे. १५ एप्रिलपर्यंत भरणाऱ्या यात्रा महोत्सवात राज्याच्या कानाकोपऱ्यासह आंधप्रदेश, तेलंगणा येथील लाखों भाविक महाकाली मातेच्या दर्शन घेणार आहेत. (Chandrapur Mahakali Yatra )
देवी महाकालीच्या दर्शनाने भक्तांचे सर्व संकट दूर होतात. त्यांना अभिष्ट सिध्दी प्राप्त होते. त्यामुळे अनेक भक्त या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येतात. देवीसमोर दीपदान, अन्नदान आणि विविध विधी करतात. पंधरा दिवस राज्यभरातील व बाहेरील भक्तांचा मेळा या ठिकाणी लागणार आहे. (Mahakali Yatra)
राज्यातील चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर हे विदर्भातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर गोंड राजवंशाच्या इतिहासाशी संबंधित आहे. मंदिराच्या स्थापनेबद्दल विविध आख्यायिका आहेत. एका कथेनुसार, गोंड राजा खांडक्या बल्लाळशहा (इ.स. १४७२-१४९७) यांना झरपट नदीच्या काठी एक भुयारात महाकाली देवीची मूर्ती आढळली. राजाने त्या ठिकाणी छोटेसे मंदिर बांधले. नंतर, राणी हीराई (इ.स. १७०४-१७१९) यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिराची उभारणी केली. मंदिराचे क्षेत्रफळ सुमारे ६०४६० फूट असून उंची ५० फूट आहे. मंदिराच्या चार कोपऱ्यांवर चार घुमट आणि मध्यभागी एक मोठा घुमट आहे. गर्भगृहात देवी महाकालीची पाच फूट उंचीची पाषाणात कोरलेली मूर्ती आहे, जिने एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात ढाल धारण केली आहे. मूर्तीसमोर महादेवाची मोठी पिंड स्थापित आहे.
चैत्र आणि आश्विन नवरात्रौत्सवात मंदिरात विशेष पुजा आणि महाआरती केली जाते. देवी महाकली या मंदिराच्या मुख्य देवता आहेत. त्यांना ग्राम देवता मानले जाते. मंदिराच्या गर्भ गृहातील महाकालीची मूर्ती अत्यंत शक्तीशाली आणि जागृत मानली जाते. भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या माता महाकालीची यात्रा चैत्रात दरवर्षी पंधरा दिवस भरते. भाविक यावेळी चंद्रपूरात येऊन मातेचे भक्तीभावाने दर्शन घेतात. या भक्तांकरीता जिल्हा प्रशासनाने विविध सोई सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
प्रशासनाद्वारे महाकाली मंदिरासमोरून बैल बाजार परिसरात जाणारा रस्ता अतिशय अरुंद असल्याने ग्लास फॅक्टरी जवळून माता महाकाली नगरीपर्यंत मोठा मार्ग बनविण्यात आला आहे. बैलबाजार भागात पटांगणाची पूर्णतः सफाई व सपाटीकरण करून याच भागात भाविकांना निवासासाठी 4 मोठे मांडव उभारण्यात आले आहे. तसेच मंदिर संस्थेची निवास व्यवस्था व सशुल्क निवास व्यवस्था सुद्धा यात्रा मैदानात उपलब्ध आहे.
भाविकांना पिण्यासाठी 12 ठिकाणी 2 हजार लिटरची क्षमता असलेल्या 20 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असून भूमिगत पाइप टाकून पाण्याचे नळ उभारण्यात येऊन पाण्याचे टँकरसुद्धा सज्ज ठेवण्यात येत आहे. भाविकांना त्यांची वाहने ठेवण्यास त्यांच्या येण्याच्या मार्गापासून जवळ असेल असे 5 वाहन तळ निश्चित करण्यात आले आहेत.
यात्रा मैदान येथे व मनपा स्वच्छता झोन इमारत अशा 2 जागी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून यात्रा मैदान येथे 33 पक्के शौचालय तर 5 ठिकाणी फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा स्वच्छता झोन इमारत व यात्रा मैदान नियंत्रण कक्षाजवळ निःशुल्क प्रथोमपचार वैद्यकीय सेवा तसेच 24 तास रुग्णवाहिका व अग्निशमन सेवा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.
संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था उभारली गेली असुन वादळ, वारा, पाऊस अशी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास नागरिकांना स्थलांतरित करण्याकरिता मनपाच्या शाळा व इतर ठिकाणे मिळून 18 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. येथे यात्रा मैदान, मनपा सफाई झोन इमारत, माता महाकाली मंदिराव्या बाजूला मदतीसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.
वाहतूक पोलिस विभागातर्फे अंचलेश्वर दरवाजा ते बागला चौक परिसर नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात वाहने व दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. यात्रा परिसरावर विविध ठिकाणी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिस विभाग लक्ष ठेऊन आहे.
यात्रेकरू महिलांसाठी हिरकणी कक्ष यात्रा मैदान (नियंत्रण कक्षा लगत) उभारण्यात आले असून मदतीसाठी दुरध्वनी क्रमांक सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत. प्रशासनाद्वारे दिल्या जात असणाऱ्या या सर्व सुविधांची माहिती ही पत्रकाद्वारे देण्यात आली असून सदर पत्रके सर्व यात्रा परिसरातील सेवा केंद्रांवर उपलब्ध आहेत.
बागला चौक, अंचलेश्वर गेट बस स्टैंड, महाकाली गेटसमोर, यात्रा मैदान, जटपुरा गेट, चांदा क्लब ग्राउंड जवळ, अंचलेश्वर गेट, गुरुमाउली मंदिर जवळ, बागला चौक, मंदिर जवळील पेट्रोल पंप जवळ, कोहिनूर तलाव, महाकाली टाकी खाली.
मूल रोडकडून येण्याऱ्या यात्रेकरूंसाठी - सिद्धार्थ स्पोर्टिंग क्लब ग्राउंड, नायरा पेट्रोल पंपाजवळ, बायपास रोड, बल्लारपूर रोडकडून येण्याऱ्या यात्रेकरूंसाठी - डी. एड. कॉलेज ग्राउंड, चंद्रपूर, सर्व यात्रेकरूंसाठी कोहिनूर स्टेडियम (कोनेरी तलाब ग्राउंड), दादमहाल वार्ड, जेल रोड, सर्व यात्रेकरूंसाठी - यात्रा मैदान, रेल्वे लाइनजवळ, चंद्रपूर, नागपूर रोडतर्फे येण्याऱ्या यात्रेकरूंसाठी न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंड, चांदा क्लब ग्राउंड समोर, वरोरा नाका येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.