

चंद्रपूर : मध्य प्रदेश राज्यातून अवैधरित्या आणलेली परदेशी दारू चंद्रपूर जिल्ह्यात तस्करीसाठी नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन तस्करांना अटक केली. या कारवाईत १७ पेट्या विदेशी दारू आणि एक वाहन असा एकूण ५ लाख ११ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १५ ऑगस्ट रोजी नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की, मध्य प्रदेशातून अवैध दारू ब्रम्हपुरी येथे नेण्यात येणार आहे. त्यानुसार पथकाने मौजा बाम्हणी रोडवर नाकाबंदी करून सापळा रचला. दरम्यान संबधित वाहन आल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्यात १५ पेट्या रॉयल स्टॅग विदेशी दारू (७२० बाटल्या, १८० एम.एल.) किंमत १,८७,००० रुपये व २ पेट्या रॉयल स्टॅग विदेशी दारू (१९० बाटल्या, ९० एम.एल.) किंमत २४,००० रुपये असा माल मिळून आला. त्याचबरोबर सदर वाहनासह एकूण ५,११,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी प्रफुल प्रकार घरडे (वय ३१) रा. हनुमान नगर, ब्रम्हपुरी आणि अक्षय रुपचंद पिल्लेवार (वय २७) रा. देलनवाडी, ब्रम्हपुरी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध नागभीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कॉक्रेडवार, बलराम झाडोकार, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, पोहवा जयंता चुनारकर, नितेश महात्मे, पोअं गणेश भोयर, प्रदीप मडावी, अजित शेन्डे व चापोहवा दिनेश अराडे यांनी केली.