

Chandrapur Lightning Strike Casualties
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी (दि.१७) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान वीज पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांत पोंभूर्णा आणि मूल तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला. पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथे शेतातून पत्नीसमवेत घरी परतणाऱ्या शेतकऱ्यावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. दुसरीकडे, मूल तालुक्यातील उसराळा येथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथे केशव डोनु गुडी (५५) हे पत्नी वैशाली केशव गुडी (४५) यांच्यासह शेतातील काम आटोपून घरी परतत होते. दरम्यान, ऋषी आलाम यांच्या शेताजवळ अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत केशव गुडी यांचा मृत्यू झाला, तर पत्नी वैशाली गुडी गंभीर जखमी झाल्या. जखमी वैशाली गुडी यांना तातडीने पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे चेकठाणेवासना गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मूल तालुक्यातील उसराळा येथेही वीज पडून एका गुराख्याचा मृत्यू झाला. मूल शहरापासून अंदाजे ८ ते ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या उसराळा गावातील दीपक नारायण मडावी (अंदाजे ३५) हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास तालुक्यात सुसाट वाऱ्यासह मेघगर्जना आणि पाऊस सुरू असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील कार्यवाही सुरू आहे. या घटनेने उसराळा गावातही शोककळा पसरली आहे.