

Chimur Taluka Palasgaon lightning incident
चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील पळसगाव गावात गुरुवारी (दि. ७) दुपारी दोन वाजताच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी पावसात वीज पडून गावातील एका कुटुंबाचे घर जळाले आहे. मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे.
चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील करंदास गोमाजी मेश्राम यांच्या झोपडीवर आज दुपारी वीज कोसळल्याने झोपडीने काही क्षणातच पेट घेतला आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत मच्छी पकडण्यासाठीचे संपूर्ण साहित्य, जाळे, लोखंडी तार, पिपे, सायकल, पंखा, ड्रम, कपडे व घरगुती जीवनावश्यक वस्तूं जळाल्या.
विशेष म्हणजे, या झोपडीत काही वेळापूर्वी दोन व्यक्ती उपस्थित होत्या. परंतु केवळ दोन मिनिटे आधी ते दोघे झोपडी शेजारी असलेल्या घरात गेले आणि यामुळे एक मोठा अनर्थ टळला. जर ते झोपडीतच थांबले असते, तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती. "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा अनुभव गावकऱ्यांनी प्रत्यक्ष घेतला.
या घटनेनंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत झोपडीतील सगळे साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेमुळे मेश्राम कुटुंबावर दुर्दैवाचे मोठे संकट कोसळले असून, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली आहे.