

चंद्रपूर : आपल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून गोरगरिबांची तब्बल 2 कोटी 36 लाख 60 हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हैद्राबाद येथील ग्रँड फॉर्च्युन इन्फ्रा डेव्हलपर्स या कपंनीविरुध्द तसेच आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी याने ग्रॅन्ड फॉर्च्युन इंन्र्फॉ डेव्हलपर्स कंपनी हैद्राबाद स्थापन करून विविध स्किमद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील गोरगरीब लोकांची फसवणूक केली. त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. याबाबत रेवनाथ आनंद एकरे (46 वर्षे, रा. वार्ड न. 3, पोलीस स्टेशनच्या मागे गडचांदूर) यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे दिली असून सदरचा गुन्हा 18 नोव्हेंबर 2022 रोजी नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपीने 2 कोटी 36 लक्ष 60 हजार रुपयांची फसवणुक केल्याचे आढळले.
या गुन्ह्यातील आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. आजपर्यंत ज्या गुंतवणुकदारांनी परिशिष्ट क्र. 1 चे फॉर्म भरून दिले नाही, त्यांनी आठ दिवसाचे आत आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे जमा करावे असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे. तसेच आरोपीचा सुगावा लागल्यास पोलिस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर 07172-273258, 07172-264702 येथे माहिती देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर करीत आहेत.