

चंद्रपूर : वैनगंगा नदीच्या पात्रात तसेच काठावरील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत आहेत. परंतु 42 अंशाच्या पार गेलेल्या तापमानामुळे वैनगंगेचे पात्र कोरडे झाल्याने दोन्ही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार वैनंगंगेच्या पात्रात ठिय्या आंदोलन करून गोसेखुर्दचे पाणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेला सोडण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. वडेट्टीवार यांनी केलेल्या मागणीला यश येताना दिसत आहे. दोन्ही जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारण्यासाठी आज शनिवारी ( दि. 12 ) ला भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी वैनगंगेला सोडण्यात आले.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहत आहे. या नदी काठावर व पात्रात दोन्ही जिल्ह्यातील अनेक नळ पाणी पुरवठा योजनांचे पिण्याचे पाण्याचे स्रोत आहेत. परंतु चाळीशी पार गेलेल्या चंद्रपूर व गडचिरेाली जिल्ह्यातील तापमानामुळे येथील पाण्याची पातळी खोल गेली आहे. वैनगंगा त्याला अपवाद नाही. नदीचे पात्र पूर्णत: कोरडे झाले आहे. परिणामत: नळ पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत आटल्याने पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही वास्तविकता लक्षात घेता माजी मंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी वैनगंगा नदीमध्ये ठिय्या आंदोलन करून सरकारने दोन्ही जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईकडे सरकारचे लक्ष वेधले.
रखरखत्या उन्हात वैनगंगेच्या पात्रात ठिय्या आंदेालन करून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्दचे पाणी चंद्रपूर व गडचिरेाली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला सोडण्याची मागणी केली होती. जेणेकरून दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना माहे एप्रिल, मे व जून मध्ये निर्माण होणाऱ्या भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. या मागणीला घेऊन काँग्रेसचे कार्यकर्तेही वैनंगगेच्या पात्रात वडेट्टीवारांसोबत ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते, हे विशेष. वडेट्टीवारांच्या मागणीला यश येताना दिसत आहे.
आज शनिवारी गोसेखुर्दचे पाणी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात आले.हे पाणी 40 क्यूमॅक्सने पाणी आले आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा प्रशासनाने सर्तकतेचा इशारा दिला आहे. यावेळी नदी पात्रातून आवागमण करणाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दोन्ही जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक ती संपूर्ण खबरदारी घ्यावी तसेच स्थानिक स्तरावरही अवगत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एप्रिल मध्येच भिषण पाणी टंचाईचा सामना करीत असलेल्या नागरिकांना आकस्मिक गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी वैनगंगेत सोडण्यात येणार असल्याने तुर्तास दिलासा मिळाला आहे.