

चंद्रपूर : सोमवारच्या मध्यरात्रीपासून चंद्रपूर जिल्ह्यावर वरुणराजाने कृपावृष्टी केली असून, मंगळवारी पावसाचा जोर आणखी वाढला. विशेषतः ब्रह्मपुरी तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, येथे विक्रमी १६२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे, तर वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. शहरातील भूती नाला आणि बोरगाव नाल्याला पूर आल्याने अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.
ब्रह्मपुरी-वडसा मार्ग: पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने बंद
ब्रह्मपुरी-गडचिरोली मार्ग: आरमोरीपुढील नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प.
ग्रामीण भागातील संपर्क तुटला:
कन्हाळगाव-अरेर-नवरगाव मार्ग (नाऱ्या नाल्याला पूर).
गांगलवाडी-जुगनाळा-चौगान-मांगली मार्ग.
ब्रह्मपुरी-गांगलवाडी आणि ब्रह्मपुरी-पारडगाव-तोरगाव खुर्द-नान्होरी मार्गही पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद आहेत.
यामुळे अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे स्थानिक पावसाचा जोर, तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत होत असल्याने नदीने रौद्ररूप धारण केले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातून वाहणारी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतीची कामे थांबली आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, या पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. रोवणीसाठी आवश्यक असलेले पाणी आता शेतात साचले असून, पावसाने उघडीप देताच शेतीच्या कामांना वेग येणार आहे. त्यामुळे एकीकडे नुकसान होत असले तरी, दुसरीकडे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक १६२.८ मिमी, बल्लारपूरमध्ये ७७.५ मिमी, तर सावलीत ६२.२ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय राजुरा (७२.६ मिमी), पोंभुर्णा (५६.५ मिमी), कोरपना (५९.१ मिमी) आणि नागभीड (५०.५ मिमी) या तालुक्यांमध्येही समाधानकारक पाऊस झाला.