

चंद्रपूर : शहरातील पागलबाबा नगरातील कर्मवीर मा. सां. कन्नमवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील भंगार साहित्याला आज बुधवारी(दि.19)दुपारच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली. भंगार साहित्यामध्ये रासायनिक पदार्थ असल्याने आगीने रौद्ररूप घेतले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. संपूर्ण भंगार जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. आगीचे कारण समजले नाही.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पागलबाबा नगर येथे मागील 10 वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयचे निर्माण कार्य सुरू आहे. किमान 50 एकरात हे महाविद्यालय असून येथील सर्व इमारतीमध्ये 'एअर कुल्ड सिस्टमचे काम सुरू आहे. बाल रुग्ण विभागात सद्या काम सुरू असताना बाहेर काही अंतरावर असणाऱ्या याच कामांच्या साहित्याला अचानक आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास आग लागली. यातील रासायनिक साहित्याने पेट घेतल्याने आगीचे लोळ उसळले व काळाधूर परिसरात पसरला. याचवेळी मनपाच्या अग्निशमन पथकास पाचारण करण्यात आले. तब्बल 3 तासांनंतर आग आटोक्यात आली आहे. यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली. आगीचे स्थान इतर इमारती पासून दूर असल्याने दुसरे कोणतेही नुकसान झाले नाही.
आगीचे वृत्त कळताच मनपाच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. उप अग्निशमन अधिकारी विकास शहाकार, लिडिंग फायरमन जितेंद्र वाकडे, मुनिद येरेवार, पियुष सहारे, फायरमन चौधरी, कार्तिक नंदवंशी यांनी एक फायर टेंडर गाडी व 3 टँकरच्या मदतीने 3 तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. बल्लारपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलास देखील पाचारण करण्यात आले.