ताडोबात येणारा प्रत्येक पर्यटक आपल्यासाठी देवाप्रमाणे : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

मोहर्ली येथे पर्यटन प्रवेशद्वार, संकुल व निसर्ग माहिती केंद्राचे लोकार्पण
Chandrapur News
संकुल व निसर्ग माहिती केंद्राचे लोकार्पणावेळी बोलताना पालकमंत्री मुनगंटीवारPudhari Photo
Published on
Updated on

चंद्रपूर (पुढारी वृत्तसेवा) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ही आपल्यासाठी परमेश्वराची देण आहे. जगभरातील लाखो पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतात. व्याघ्र दर्शनासाठी आलेला पर्यटक येथून चंद्रपूरचे नाव कायमचे सोबत घेऊन जातो. येथे आलेल्या पर्यटकांच्या दृष्टीने ताडोबा आणि चंद्रपूरचे नाव हे त्यांच्या आयुष्याचा ठेवा असावा. त्यासाठी पर्यटकांसोबत आपली वर्तणूक चांगलीच असली पाहिजे. कारण इथे येणारा प्रत्येक पर्यटक आपल्यासाठी देवासमान आहे, अशी भावना राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. मोहर्ली येथे पर्यटन प्रवेशद्वार, संकूल, निसर्ग माहिती केंद्र व इतर सुविधांचे लोकार्पण ना. शमुनगंटीवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा बनबल प्रमुख शोमिता विश्वास, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वन अकॅडमीचे संचालक एम.एस. रेड्डी, क्षेत्रसंचालक तथा मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी येल्लू, उपसंचालक (बफर) पियुषा जगताप, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, प्रसिध्द डॉक्टर तथा निसर्गप्रेमी रमाकांत पांडा, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे सदस्य प्रकाश धारणे, अरुण तिखे, मोहर्लीच्या सरपंच सुनीता कातकर, पद्मापूरच्या सरपंच आम्रपाली अलोने आदी उपस्थित होते.

वनमंत्री  मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज अतिशय आनंदाची बाब आहे. चंद्रपूर नेहमीच पुढे राहावा, असाच आपला प्रयत्न असतो. वाघ हा पर्यावरणाचा मित्र असून ताडोबा ही आपल्याला परमेश्वराची देण आहे, त्याचे रक्षण आपल्याला करायचे आहे. वाघाचे संरक्षण केले म्हणूनच जिल्ह्यात वाघ वाढले. चंद्रपूर पर्यटनाच्या माध्यमातून पुढे जावे, यासाठी सिंगापूरच्या धर्तीवर आपण चंद्रपुरात सफारी करीत आहोत. सफारीसाठी आलेले पर्यटक सैनिक शाळा, आर्मी म्युझियम, बॉटनिकल गार्डन, वन अकादमी, एसएनडीटी विद्यापीठ, आदींचा आनंद घेऊ शकणार आहेत. चंद्रपुरात वाघांची संख्या सर्वाधिक आहे.’ चंद्रपूरच्या विकासासाठी पूर्ण शक्तीने काम करणार आहे. मोहर्ली, ताडोबा, बफर झोन, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आपण पूर्ण शक्तीने काम करीत आहोत. तसेच प्रत्येक गावाला स्वयंपूर्ण करण्याचा आपला मानस आहे. आपण सर्वजण मिळून ताडोबाचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर करुया. यासाठी सर्व वनमजूर, वन अधिकारी, वनरक्षक, वनसेवक, रोजंदारी करणारे कर्मचारी आदींचे मोठे योगदान आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.

जिप्सी असोसिएशनला 25 लक्ष देणार :

वन विभागात आपण अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एफडीसीएमच्या माध्यमातून वन कर्मचाऱ्यांना राहिलेला फरक देण्यात आला आहे. प्रत्येक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना वाहन देण्यासाठी आपण आग्रही भूमिका मांडली. तसेच ताडोबा फाउंडेशन मधून जिप्सी असोसिएशनला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिप्सी असोसिएशनची वागणूक चांगली असली तरच पर्यटकांचे समाधान होईल व जिल्ह्याचे नाव उंचावेल.

ग्राम परिस्थितीकी विकास समिती यांना धनादेश वाटप :

यावेळी ग्राम परिस्थितीकी विकास समित्यांना प्रत्येकी 3 लक्ष 50 हजारांचा धनादेश ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यात खुंटवडा, भोसरी, काटवल, वडाळा, कोकेवाडा, बिलोडा, किन्हाळा, सोनेगाव, आष्टा, निंबाळा, चेकबोर्ड, मामला, हळदी, अर्जुनी, वायगाव, झरी, घंटाचौकी, दुधाळा, मोहर्ली, घोडेगाव, मुधोली, आगरझरी, सितारामपेठ, भांबेरी आदी गावांचा समावेश होता.

गुराख्यांना स्मार्ट स्टिकचे वाटप :

यावेळी गुराख्यांना वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्मार्ट स्टिकचे वाटप करण्यात आले. यात मारुती जांभुळे, गणेश श्रीरामे, बुद्रुक कुलसंगे, अंकुश केदार, नरेंद्र डडमल, प्रकाश कन्नाके, लक्ष्मण तोफे, जयंत गडमल, विश्वनाथ मरसकोल्हे, मारुती आत्राम, राहुल आत्राम, वासुदेव सिडाम, परशुराम मडावी आदींचा समावेश होता. तत्पूर्वी, वनमंत्र्यांच्या हस्ते अनंत सोनवणे लिखित ‘एक होती माया’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी तर संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news