

चंद्रपूर : चिमुर तालुक्यातील नेरी परिसरातील मोखाडा नदी पात्रात धुमाकूळ घालून दशहत पसरविणाऱ्या तिन वर्षाच्या वाघिणीला आज सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास जेरबंद करण्यात वनविभागाल यश आले आहे. वाघिण जेरबंद झाल्याने मोखाडा, नेरी सरडपार परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
चिमूर तालुक्यातील नेरी परिसरातील मोखाडा नदीच्या परिसरात बऱ्याच दिवसांपासून या वाधिणीने धुमाकुळ घातला होता. परिसरातील गावातील अनेक जनावरे फस्त केली होती. त्यामुळे या मध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वाघिणच्या धुमाकुळामुमळे शेतकऱ्यामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. नागरिकांनी वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी लावून धरली होती.
ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत तळोधी वन परिक्षेत्रातील नेरी उपवन क्षेत्रात वाघिणीला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. तेव्हापासून तळोधी उपवनक्षेत्राचे वन अधिकारी व कर्मचारी हे पाळत ठेवून होते. आज सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास वन अधिकारी व कर्मचारी हे मोखाडा नदी पात्रात गस्त घालीत असताना वाघिण पिंजऱ्यात अडकल्याचे आढळून आले. लगेच ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवन संरक्षकांना माहिती देण्यात आली. सहायक वन संरखक महेश गायकवाड, वन परिक्षेत्राधिकारी अरूण कन्नमवार, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. आर.एस. खोब्रागडे, पोलिस नाईक (शुटर) मराठे, अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे राकेश आहुजा, क्षेत्र सहायक चंद्रशेखर रासेकर व वनाधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पिंजऱ्यात अडकलेली वाघिण ही 3 वर्षाची असून ती टि एन 1 या नावाने ओळखली जाते. लगेच वाघिणीला बेशुध्द करून वनविभागाने ताब्यात घेतले आहे. वाघिण जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेला नि:श्वास सोडला आहे. अनेक दिवसांपासून दहशत माजविणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात आल्याने तृर्तास तरीही नागरिक दहशत मुक्त झाले आहेत.