
चंद्रपूर : पंतप्रधान मोदी यांची चिमूर येथे उद्या सभा होणार आहे. या सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
उद्या मंगळवारी (दि.१२) सकाळी ८ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत भिसी ते पिंपळनेरीपर्यंत व जांभुळघाट ते आर.टी.एम कॉलेज, चिमुरपर्यंत सर्व प्रकारची जड वाहतूक बंद राहील. इतर वाहनांना चिमुर जाण्यासाठी आर.टी.एम कॉलेज-नेरी रोड मार्गे चिमुर बायपास मार्गे चिमुर शहरात जाता येईल. त्याचप्रमाणे नेरी ते आर.टी.एम कॉलेज चिमुरपर्यंत सर्व प्रकारची जड वाहतूक बंद राहील. इतर वाहने नेरी-चिमुर बायपास मार्गाने चिमुर शहरात जातील व बायपास मार्गेच बाहेर पडतील. त्याचप्रमाणे हजारे पेट्रोलपंप ते आर.टी.एम कॉलेजपर्यंत, हजारे पेट्रोलपंप ते संविधान चौक चिमुर वडाळा पैकूपर्यंत व हजारे पेट्रोलपंप ते नेहरू चौक चिमुरपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. तसेच वरोराकडून चिमुर शहरात जाण्यासाठी हलक्या वाहनांना नेहरू चौक या मार्गाचा अवलंब करता येईल. या सर्व मार्गांवर सभेकरीता येणाऱ्या वाहनांना प्रवेश राहणार असून आवश्यकतेनुसार सदर कालावधीत ठराविक वेळेकरीता सर्व प्रकारची वाहतुक बंद करण्यात येणार आहे.
या कालावधीत अवजड वाहतुकदारांना पुढील पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.१. भिसी ते चिमुर-वरोरा-चंद्रपुर जाण्यासाठी कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा. २.जांभुळघाट ते चिमुर किंवा वरोरा-चंद्रपुर जाण्यासाठी भिसी-कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा. ३. नेरीवरून चिमुर किंवा वरोरा-चंद्रपुर-भिसीला जाण्यासाठी जांभुळघाट भिसी- कन्हाळगांव- महालगांव- तिरपुरा- गदगांव या रोडचा अवलंब करावा. ४. वरोराकडून भिसी-जांभुळघाटला जाण्यासाठी गदगाव- तिरपुरा- महालगांव-कन्हाळगांव या मार्गाचा अवलंब करावा. गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी सर्व प्रकारच्या वाहतुकदारांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.