

Chandrapur Yuva Sena Protest vs Shinde Sena
चंद्रपूर : शिवसेना पक्षाशी गद्दारी करून शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांविरोधात युवासेना चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी भर पावसातही मोठ्या संख्येने उपस्थित राहत घोषणाबाजी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे खासदार म्हणून निवडून आलेल्या सहा खासदारांनी पक्षाशी गद्दारी करत शिंदेसेनेत प्रवेश केला असून त्यांनी मतदारांच्या विश्वासाचा अपमान केला असल्याचा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी केला. चंद्रपुरात आयोजित निषेध आंदोलनात ते बोलत होते.
यावेळी सहारे यांनी सांगितले की, यापूर्वी 40 आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी करत सत्ताधारी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि आता सहा खासदारांनीही पक्षाशी विश्वासघात केला आहे. "50 खोक्यांच्या लोभापायी या खासदारांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली असून, शिवसैनिक हा विश्वासघात सहन करणार नाही," अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
भर पावसात सुरू असलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी "गद्दार गद्दार" अशा जोरदार घोषणा देत निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान वातावरण चांगलेच तापले होते. शिवसैनिकांमध्ये मोठा संताप दिसून येत होता.
यावेळी विक्रांत सहारे यांनी इशाराही देत म्हटले की, "या सहा गद्दार खासदारांपैकी एकही खासदार चंद्रपूर जिल्ह्यात आला तर त्याच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही. शिवसैनिक आता पेटून उठला असून गद्दारांना आता माफी नाही."
या आंदोलनात युवासेना जिल्हा चिटणीस सुमित अग्रवाल, बाळू भगत, युवासेना उपजिल्हाप्रमुख यशपाल उर्फ बंटी कमटम, माजी तालुका प्रमुख प्रशांत भाऊ गट्टूरवार, युवासेना तालुकाप्रमुख महेश श्रीगिरवार, विवान रामटेके, तालुका समन्वयक सागर गबने यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.