विरा वाघीण बनली तेरा बछड्यांची माता! पळसगाव बफरमध्ये नव्या तीन पाहुण्यांचे आगमन

Chandrapur news | ताडोबाच्या पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनासाठी आनंदाची बातमी
विरा वाघीण बनली तेरा बछड्यांची माता! पळसगाव बफरमध्ये नव्या तीन पाहुण्यांचे आगमन
Published on
Updated on

चंद्रपूर : पळसगाव (पि.) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या पळसगाव बफर वनपरिक्षेत्रात पुन्हा एकदा आनंदाची चाहूल लागली आहे. पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली ‘विरा’ ही वाघीण आपल्या चौथ्या प्रसूतीत तीन गोंडस बछड्यांसह आढळून आली आहे. आतापर्यंत तिने तब्बल तेरा बछड्यांना जन्म देत ताडोबा परिसरातील व्याघ्र संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नव्या बछड्यांच्या आगमनामुळे पळसगाव जंगल परिसरात उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विराने पहिल्यांदा बेलारा-गोंडमोहाळी जंगल परिसरात दोन बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रसूतीमध्ये प्रत्येकी चार बछड्यांची भर पडली. आता चौथ्यांदा पळसगाव जंगल परिसरात तिने तीन बछड्यांना जन्म दिल्याने तिच्या एकूण अपत्यांची संख्या तेरा झाली आहे. जंगलातील बदलत्या परिस्थितीत सातत्याने आपल्या पिल्लांचे संगोपन करणारी विरा ही अनुभवी आणि सक्षम वाघीण म्हणून ओळखली जात आहे.

सध्या विरा आपल्या तीन लहान बछड्यांसह अत्यंत सावधपणे जंगल परिसरात वावरताना दिसून येत आहे. बछडे अजून लहान असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी ती अधिक सतर्क झाली असून सुरक्षित अधिवास, पाण्याची उपलब्धता आणि भक्ष्यांची मुबलकता असलेल्या परिसरात तिचा मुक्काम असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

ताडोबा परिसरात गेल्या काही वर्षांत वाघांची संख्या सातत्याने वाढत असून त्यामागे विरासारख्या सक्षम वाघिणींचे मोठे योगदान असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. विशेष म्हणजे विराच्या नव्या बछड्यांचे फोटो आणि हालचालींची माहिती समोर येताच वन्यजीव प्रेमी, छायाचित्रकार आणि पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पळसगाव बफर क्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले असून पर्यटनाच्या दृष्टीनेही या भागाचे महत्त्व वाढले आहे.

झुनाबाई आणि कंनकाझरीची कन्या ‘विरा’

विराचा जन्म मदनापूर पर्यटन क्षेत्रातील प्रसिद्ध वाघीण ‘झुनाबाई’ आणि रुबाबदार नर वाघ ‘कंनकाझरी’ यांच्या पोटी झाला होता. बेलारा गेट परिसरातील प्रसिद्ध नर वाघ ‘झायलो’ हा विराचा जोडीदार मानला जातो. तसेच झुनाबाईचा पुत्र ‘पुष्पा’ वाघाचाही याच परिसरात वावर असल्याने हा संपूर्ण जंगल पट्टा सध्या वाघांच्या उपस्थितीमुळे समृद्ध बनला आहे.ताडोबा परिसरातील वाघांच्या वाढत्या संख्येमुळे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण या जंगलाकडे वाढत आहे. विशेषतः बफर क्षेत्रात वाघांचे सहज दर्शन घडत असल्याने पळसगाव, बेलारा आणि गोंडमोहाळी परिसर पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे समोर येत आहेत.

वनविभाग सतर्क

“पळसगाव वनपरिक्षेत्रात विरा वाघीण तीन बछड्यांसह आढळून आली आहे. विराने आतापर्यंत तेरा बछड्यांना जन्म देणे ही ताडोबा परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. बछड्यांच्या सुरक्षेसाठी वनविभाग सतर्क असून नागरिकांनी जंगल परिसरात अनावश्यक वावर टाळून वनविभागाला सहकार्य करावे,” असे आवाहन पळसगाव बफरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news