

Warora Panchayat Samiti Bribe Case
चंद्रपूर : बार अँड रेस्टॉरंटच्या बांधकाम परवानगीसाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर तीन लाख रुपये स्वीकारणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (दि. ६) खांबाळा येथे रंगेहात पकडले. या प्रकरणातनागरी ग्रामपंचायतचे ग्राम पंचायत अधिकारी आणि वरोरा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (पंचायत) अशा दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे वरोरा तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
एसीबीने ताब्यात घेतलेल्या लोकसेवकांमध्ये पांडुरंग निलकंठ पेंदे (वय ४८), ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय नागरी, ता. वरोरा आणि प्रणव सुधाकर बक्षी (वय ५१), विस्तार अधिकारी पंचायत, पंचायत समिती वरोरा यांचा समावेश आहे.
तक्रारदार आणि त्यांच्या भावाच्या नावे असलेल्या शेतजमिनीवर बार अँड रेस्टॉरंट उभारण्याचे नियोजन होते. या बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असलेले ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याकरिता ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग पेंदे यांनी स्वतःसाठी तसेच आपले वरिष्ठ विस्तार अधिकारी प्रणव बक्षी यांच्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने २ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात दिली.
शासकीय काम करून घेण्यासाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. त्यानंतर विभागाने तक्रारीची शहानिशा करून लाच मागणीची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू केली.
४ नोव्हेंबर रोजी पंचांच्या उपस्थितीत तक्रारदाराने ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग पेंदे यांची वरोरा येथील आनंदवन चौकात भेट घेतली. यावेळी बार अँड रेस्टॉरंटच्या बांधकाम परवानगीसाठी एनओसी देण्याच्या मोबदल्यात पेंदे यांनी स्वतःसाठी व वरिष्ठ प्रणव बक्षी यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. मात्र, चर्चेदरम्यान तीन लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यानंतर ५ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराने पंचांसह पंचायत समिती वरोरा कार्यालयात जाऊन दोन्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पांडुरंग पेंदे आणि प्रणव बक्षी या दोघांनीही तडजोडीनंतर तीन लाख रुपये स्वीकारण्यास पंचांसमक्ष सहमती दर्शविल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले.
आज शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पांडुरंग पेंदे यांनी सांगितलेल्या ठिकाणी तक्रारदार पंचांसह मौजा खांबाळा येथे पोहोचला. यावेळी पांडुरंग पेंदे यांनी तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच स्वीकारली. पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न होताच एसीबीच्या पथकाने कारवाई करीत पेंदे यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी प्रणव बक्षी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन्ही लोकसेवकांविरुद्ध पोलीस स्टेशन वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची नोंद करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक तेजराम मेश्राम यांच्यासह पोलीस हवालदार हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, पोलीस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, महेश माहुरपवार, महिला पोलीस शिपाई सीमा झाडे, वायरलेस पोलीस शिपाई सतीश सिडाम तसेच चालक पोलीस शिपाई संदीप कवरासे यांचा समावेश होता.