Chandrapur Crime : ट्रकचे टायर चोरीप्रकरणी मध्य प्रदेशातील दोघांना अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

राजुरा पोलिसांची कारवाई
Chandrapur Crime News
ट्रकचे टायर चोरीप्रकरणी मध्य प्रदेशातील दोघांना अटक
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : लॉयड्स मेटल येथील रेल्वे सायडिंग परिसरात उभ्या असलेल्या दोन ट्रकमधील डिस्कसह १७ टायर चोरल्याच्या प्रकरणाचा राजुरा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीचे १७ टायर आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप, असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

फिर्यादी राकेशकुमार देवीलाल रांगडाले (वय ४७, रा. रायपूर, छत्तीसगड) हे एका ट्रान्सपोर्टिंग कंपनीशी संबंधित आहेत. त्यांच्या कंपनीचे (सीजी २२ एके ७९८२) आणि (सीजी २२ एके ९२००) क्रमांकाचे दोन ट्रक ८ ऑक्टोबर रोजी रायपूर येथून कोळशाची फाईन धूळ घेऊन राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील भाटिया कोल वॉशरीमध्ये आले होते. माल उतरल्यानंतर दोन्ही ट्रक लॉयड्स मेटलच्या राजुरा रेल्वे सायडिंगवर माल भरण्यासाठी निघाले होते.

९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास दोन्ही ट्रकचालकांचे मोबाईल बंद झाल्याने संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, रेल्वे सायडिंगवरील सुरक्षा पर्यवेक्षक इम्रान पठाण यांनी ट्रक माल भरण्यासाठी न आल्याची माहिती फिर्यादीला दिली. त्यानंतर जीपीएस लोकेशन तपासले असता दोन्ही ट्रक रेल्वे सायडिंग परिसरात असल्याचे दिसून आले. पाहणी केली असता, दोन्ही ट्रकचे डिस्कसह एकूण १७ टायर चोरीला गेल्याचे उघड झाले. यामध्ये (सीजी २२ एके ७९८२) क्रमांकाच्या ट्रकचे नऊ, तर (सीजी २२ एके ९२००) क्रमांकाच्या ट्रकचे आठ टायर चोरीला गेले होते. या टायरची एकूण किंमत दोन लाख ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्य प्रदेशातून आरोपींना अटक

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील चकौडिया परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रामलाल गिरधारी यादव (वय २७)रा. चकौडिया, जि. शहडोल आणि अजय श्रीकाशी पेटल (वय ३०) रा. ब्यौहारी, जि. शहडोल), अशी आहेत. आरोपींकडून चोरीचे १७ ट्रक टायर जप्त करण्यात आले. त्यांची किंमत दोन लाख ५० हजार रुपये असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या एमपी १८ जीए ५८६७ क्रमांकाच्या बोलेरो पिकअपची किंमत सात लाख ५० हजार रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील धांडे, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झाडोकर आणि राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news