Chandrapur Murder Case : दारूच्या आहारी गेला होता तिहेरी हत्याकांडातील आरोपी पती

Chandrapur Murder Case : दारूच्या आहारी गेला होता तिहेरी हत्याकांडातील आरोपी पती

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर जिल्ह्यात नागभिड तालुक्यातील मौशी गावात घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपी पती अंबादास तलमले हा दारूच्या आहारी गेला होता. त्याला लागलेल्या दारूच्या व्यसनातूनच त्याने पत्नीसह दोन मुलींची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते,अशी माहिती समोर आली आहे. तिहेरी हत्याकांडामुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. मौशी गावात दहशत निर्माण झाली आहे. लहान मुलगा अनिकेत हत्याकांड घडण्यापूर्वीच हॉटेलवर कामावर गेल्याने त्याचा जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पती अंबादास लक्ष्मण तलमले (वय 42) नागभिड पोलिसांच्या ताब्यात आहे. Chandrapur Murder Case

नागभिड तालुक्यातील मौशी येथील आरोपी पती अंबादास लक्ष्मण तलमले रहिवाशी आहे. त्याला पत्नी अल्का (वय 40), मोठी मुलगी प्रणाली (वय 21), लहान मुलगी तेजस्विनी (वय 16) व एक अनिकेत नावाचा मुलगा आणि एक विवाह झालेली मुलगी असा परिवार होता. आज पहाटेच्या सुमारास मुलगा अनिकेत उठून गावातील एका हॉटेलमध्ये कामावर गेला होता. तर पत्नी व मुली एका खोलीत गाढ झोपेत होते. वडील हा दुसऱ्या खोलीत झोपला होता. मुलगा कामावर गेल्यानंतर आरोपी पती अंबादास तलमले याने गाढ झोपेत असलेल्या पत्नी सह दोन्ही मुलींना एकापाठोपाठ कुऱ्हाडीने वार करून जिवानिशी ठार केले. त्यानंतर तो जाऊन झोपला होता. सकाळी पत्नी व मुली  उठल्या नाहीत. त्यामुळे शेजारील आरोपीच्या भावाने जावून बघितले असता, पत्नी आणि मुलींचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. सदर थरारक तिहेरी हत्याकांडाची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली आणि गर्दी झाली. या घटनेमुळे गावात दहशत निर्माण झाली. नागभिड पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन तिन्ही मृतदेह नागभिड उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. हत्या करून एक वेगळ्या खोलीत झोपलेला आरोपी अंबादास तलमले सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. Chandrapur Murder Case

आरोपी पती अंबादास तलमले हा शेतमजूर होता. तो कोणतेही काम करीत नव्हता. पत्नीच्या भरवश्यावर त्याचा संसार सुरू होता. तो दारूच्या आहारी गेला होता. दररोज तो दारू पिऊन घरी यायचा. दारू व्यसनामुळे पती -पत्नी मध्ये भांडण व्हायचे. काल शनिवारच्या रात्री पती व पत्नी मध्ये रात्रीपर्यंत घरगुती कारणावरून भांडण झाले होते. विशेष म्हणजे तो काम करीत नसल्यामुळे आणि दारूच्या आहारी गेल्यामुळे दारू पिण्यासाठी तो नेहमी पत्नीला पैसे मागायचा. पैसे दिले नाही तर भांडण करायचा, असी माहिती समोर आली आहे. पत्नी ही मजुरीचे काम करायची त्यावर त्यांचा संसार सुरू होता. मोठी मुलगी प्रणाली हिचा बारावीपर्यंतचा शिक्षण झालेला आहे. सध्या ती मजुरीचे काम करीत होती. लहान मुलगी तेजस्वीनी ही बारावीमध्ये कृषक विद्यालय मौशीमध्ये शिक्षण घेत होती. तिची सध्या परीक्षा सुरू होती.

तर मुलगा अनिकेत हा दहाव्या वर्गात कृषक विद्यालयातच शिकत आहे. हॉटेलमध्ये तो खर्रा घोटण्याचे मजुरीने काम करतो. आणि आज रविवारी तो पहाटेला हत्याकांड घडण्याअगोदरच कामावर गेला होता. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. तेजस्विनीच्या मृतदेहाजवळ पुस्तके अस्ताव्यस्त पडून होते. पहाटेला ती अभ्यास करीत असावी, अशी माहिती समोर आली आहे. आरोपी पती अंबादास हा मागील दोन -तीन महिन्यांपासून कुऱ्हाडसोबत घेऊन झोपत होता. त्याचे गावात पटत नव्हते. अनेकांशी त्याचे भांडणे होत होती. काही दिवसांपूर्वीच गावातील महिला सरपंचासोबत त्याचा वाद  झाला होता. दारू पिऊन त्याने सरपंचाच्या घरी जावून टीव्ही आणि आलमारी फोडली होती. त्यामुळे सरपंचांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी त्याला गाडीमध्ये बसवून नेले आणि गावाबाहेर त्याला सोडून देण्यात आले होते. त्यामुळे त्याची भांडण करण्याची हिंमत वाढतच होती, अशी माहिती समोर आली आहे.

Chandrapur Murder Case  मौशी परिसरात अवैद्य दारूची विक्री आणि खुलेआम पुरवठा

नागभिड तालुक्यातील मौशी परिसरात अवैध दारूची खुलेआम विक्री आणि पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक दारूच्या आहारी गेलेले आहेत. अनेकांची कुटुंब देशोधडीला लागण्याच्या  मार्गावर आहेत. अंबादास  हाही दारूच्या आहारी गेला होता. दारूचे व्यसन लागल्यामुळे तो कामावर जात नव्हता. दारूसाठी पैसे मिळेल तेथून मागून आपली दारूची इच्छा पूर्ण करायचा. खुलेआम दारूची विक्री आणि अन्य गावात पुरवठा सुरू असतानाही पोलीस मात्र गप्प् आहेत. या घटनेनंतर आता मौशी गावात व परिसरात अवैध धंद्यावर नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दारूच्या व्यवसायामुळे महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे पोलिसांनी या परिसरातील अवैध दारू विक्री आणि गावागावात होणारा दारूचा पुरवठा थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news