

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वाघाच्या वाढत्या वावरामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरण (MSEDCL) कर्मचाऱ्यांना वीजवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वाघ समोर आल्याने त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी विजेच्या पोलवरच आश्रय घेतला. तब्बल एक तास कर्मचारी पोलवर अडकून राहिल्यानंतर वाघ परिसरातून निघून गेल्यावरच ते सुरक्षितपणे खाली उतरू शकले.
मुल येथील महावितरण उपविभागांतर्गत येणाऱ्या फुलझरी गावात वीजवाहिनीची देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी काही कर्मचारी विजेच्या पोलवर चढून काम करत असतानाच अचानक परिसरात वाघ दिसून आला. वाघाची चाहूल लागताच कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
वाघ पोलच्या परिसरातच वावरत असल्याने खाली उतरणे धोकादायक ठरले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पोलवरच थांबण्याचा निर्णय घेतला. सुमारे एक तास ते पोलवरच अडकून राहिले. अखेर वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडत खाली उतरून उर्वरित काम पूर्ण केले.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये काम करणाऱ्या महावितरण, वनविभाग तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचा वाढता वावर आणि मानवी वस्त्यांलगत होणाऱ्या हालचालींमुळे नागरिकांसह विविध विभागातील कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.