Chandrapur Tiger Death : पळसगाव वनक्षेत्रात वाघाचा मृत्यू; बेशुद्ध करून पकडण्याच्या कारवाईदरम्यान घडली घटना

मागील महिन्यात नागरिकाचा घेतला होता बळी; यापूर्वी पकडून गाभा क्षेत्रात सोडण्यात आलेल्या वाघाचा पुन्हा लोकवस्तीत वावर
Chandrapur Tiger Death
Published on
Updated on

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पळसगाव वनक्षेत्रात लोकवस्तीच्या परिसरात वारंवार वावर करणाऱ्या उपप्रौढ वाघाचा मंगळवारी बेशुद्ध करून जेरबंद करण्याच्या कारवाईदरम्यान मृत्यू झाला. याच वाघाने गत महिन्यात चोरगाव परिसरात एका नागरिकाचा बळी घेतला होता. घटनेनंतर वन विभागाने शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू केली असून सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, टी-२०२ एफ एस-२ (T 202F S2) हा उपप्रौढ वाघ २८ जून २०२६ रोजी चोरगाव परिसरात श्री. शिडामे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला होता. या घटनेनंतर वन विभागाच्या जलद प्रतिसाद पथकाने (आरआरटी) ४ जुलै रोजी विशेष मोहिम राबवून संबंधित वाघाला बेशुद्ध करून यशस्वीरित्या पकडले होते.

वन्यजीव व्यवस्थापनाच्या नियमानुसार या वाघाला नंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात सोडण्यात आले होते. मात्र, गाभा क्षेत्रात सोडल्यानंतरही त्याने कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार केली नाही. उलट तो पुन्हा पळसगाव वनक्षेत्रातील लोकवस्तीच्या परिसरात फिरू लागल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने वन विभागाने गेल्या तीन दिवसांपासून संबंधित वाघाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले होते. त्यानंतर मंगळवारी आमिष बांधून वाघाला पुन्हा पकडण्याचा निर्णय घेण्यात आला.

कारवाईदरम्यान वन विभागाचे पथक वाघाला बेशुद्ध करण्याची प्रक्रिया राबवत असताना दुपारी सुमारे ३.४५ ते ४.०० वाजण्याच्या दरम्यान वाघाचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदनानंतरच त्याबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे. वन विभागाने सांगितले की, वाघाचे शवविच्छेदन करून त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news