वाघाच्या हल्ल्यात तीन बैल ठार; संतप्त शेतकऱ्यांचा रस्तारोको

Chandrapur tiger attack news: आंदोलनाने परिसरात तणाव ; वाघाला पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी
tiger attack news
tiger attack newsPudhari
Published on
Updated on

चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील नंदारा गावात वाघाच्या हल्ल्यात तीन बैलांचा बळी गेला असून एका बैलाला गंभीर दुखापत झाली. या घटनेने परिसरातील शेतकरी वर्ग संतप्त झाला. वनविभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याच्या आरोपावरून गुरुवारी (दि. ६ नोव्हेंबर) सकाळी शेतकऱ्यांनी चिमूर–मासळ मार्गावर ‘रास्ता रोको’ करून तीव्र निषेध नोंदवला. पोलिस आणि वनविभागाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

चिमूर तालुक्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेजवळील नंदारा (पो. मासळ बु.) येथे बुधवारी (४ नोव्हेंबर) रात्री वाघाने बैलांच्या गोठ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दिवाकर गायकवाड, चिंधू रंदये व प्रकाश आळे या शेतकऱ्यांचे तीन बैल ठार झाले, तर एक बैल गंभीर जखमी झाला. रात्री घडलेल्या या प्रकारामुळे गावात भीतीचे सावट तयार झाले आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाघाचा सतत वावर  आहे. तरीही वनविभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.त्यामुळे

घटनेनंतर गुरुवारी सकाळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. चिमूर–मासळ मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. वाहतूक ठप्प झाली आणि काही काळ दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या. यावेळी शेतकऱ्यांनी वाघाला तत्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी हलविणे, परिसरात गस्त वाढविणे,जनावरांच्या नुकसानीची तात्काळ व योग्य भरपाई देणेआदी मागण्या केल्या. वाघांच्या हल्ल्यात सतत जनावरांचे नुकसान होत आहे. पण वनविभाग वेळेत येत नाही. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो,” असेही संतप्त शेतकरी म्हणाले.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळकर, तसेच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथक तैनात केले जाईल, नंदारा व मासळ परिसरात सतत गस्त वाढवली जाईल, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमाने भरपाई देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. लिखित आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी रस्तारोको मागे घेतला.

गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

गावातील नागरिक रात्री बाहेर पडण्यास घाबरत आहेत. जनावरांना बांधण्यापासून शेतात जाण्यापर्यंत सर्वांवर भीतीचे वातावरण आहे. वाघाचा वावर वाढत असल्याने मानवी जीविताला ही धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. नंदारा परिसरातील वाघांचा वाढता वावर हा गंभीर प्रश्न बनला आहे. जनावरांच्या हानीनंतर शेतकरी आक्रमक झाले असून वनविभागाचे कामकाज प्रश्नचिन्हाखाली आले आहे. आता वनविभागाने दिलेले आश्वासन कितपत पाळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news