Chandrapur Tiger Attack | वाघाच्या तावडीतून गुराख्याची थरारक सुटका; ग्रामस्थांच्या धाडसाने जीव वाचला!

सावंगी (बडगे) येथे गोसेखुर्द कालव्याजवळ हल्ला; गुराखी गंभीर जखमी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Chandrapur Tiger Attack | वाघाच्या तावडीतून गुराख्याची थरारक सुटका; ग्रामस्थांच्या धाडसाने जीव वाचला!
Published on
Updated on

चंद्रपूर : वनपरिक्षेत्र तळोधी अंतर्गत येणाऱ्या सावंगी (बडगे) गावाजवळ रविवारी दुपारी घडलेल्या वाघाच्या हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. गोसेखुर्द कालव्याजवळ गुरे चारण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय गुराख्यावर पट्टेदार वाघाने अचानक झडप घालत जीवघेणा हल्ला केला. मात्र मृत्यू समोर उभा ठाकला असतानाही धैर्य न गमावता आरडाओरडा केल्याने आणि ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ या मराठी म्हणीचा प्रत्यय अक्षरशः आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांचन प्रकाश खोब्रागडे (वय ३० वर्ष), रा. सावंगी (बडगे) हे नेहमीप्रमाणे स्वतःची म्हैस व बैल घेऊन जंगल परिसरात चराईसाठी गेले होते. दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास ते गोसेखुर्द कालव्याजवळ पोहोचले असता झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली.

हल्ला इतका अचानक झाला की काही क्षणांतच वाघाने कांचन खोब्रागडे यांना जमिनीवर पाडून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. या जीवघेण्या प्रसंगातही त्यांनी धैर्य गमावले नाही. त्यांनी मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. त्यांच्या किंकाळ्या ऐकून जवळच असलेले रवी वाडगुरे यांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांच्या धाडसाने जीव वाचला

रवी वाडगुरे यांनी धाडस दाखवत जखमी गुराख्याला वाघाच्या तावडीतून सोडविण्यास मदत केली. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. काही क्षणांचा विलंब झाला असता तर परिणाम अधिक गंभीर झाला असता, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले. गंभीर जखमी अवस्थेतील कांचन खोब्रागडे यांना प्रथम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी सिंदेवाही येथे हलविले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

परिसरात भीतीचे वातावरण

गोसेखुर्द कालवा परिसरात यापूर्वीही वाघाच्या हालचाली वारंवार दिसून आल्या आहेत. अनेक वेळा गुरेढोरे वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याच्या घटना घडल्या असून शेतकरी व गुराखी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. आता थेट माणसावर हल्ला झाल्याने सावंगी (बडगे)सह आसपासच्या गावांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने या परिसरात गस्त वाढवून संबंधित वाघाचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच जंगलालगतच्या गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.

वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतकरी, गुराखी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news