Chandarpur Tiger Attack | शेताच्या संरक्षणासाठी गेलेल्या शेतमजुराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

खडसंगी जवळील बरडघाट येथील घटना; परिसरात भीतीचे वातावरण, वाघाच्या बंदोबस्ताची ग्रामस्थांची मागणी
Chandarpur Tiger Attack | शेताच्या संरक्षणासाठी गेलेल्या शेतमजुराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
Published on
Updated on

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खडसंगी बफर झोन अंतर्गत बरडघाट परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात एका शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेताच्या संरक्षणासाठी कुंपण उभारणीचे साहित्य आणण्यासाठी जंगलालगतच्या भागात गेलेल्या शेतमजुरावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. राजेंद्र तिमाजी भोयर (वय ५०) रा. नवेगाव असे. मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विश्वनाथ भोयर यांच्या शेताच्या संरक्षणासाठी कुंपण उभारणीसाठी लागणारे साहित्य आणण्याच्या उद्देशाने शेतमजुर राजेंद्र भोयर हे त्यांच्यासोबत जंगलालगतच्या परिसरात गेले होते. जंगलाला लागून असलेल्या शेती परिसरात काम सुरू असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात  भोयर यांचा जागीच मृत्यू झाला.

वाघाने हल्ल्यानंतर मृतदेह कंपार्टमेंट क्रमांक ५५ मधून ओढत कंपार्टमेंट क्रमांक ५४ मध्ये फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी सोबत असलेले विश्वनाथ भोयर यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवत गावाकडे धाव घेत ग्रामस्थांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तसेच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बरडघाट व आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या शेतांमध्ये काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण असून नागरिक शेतात जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news