

Chandrapur Soybean Seed Failure
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खडसंगी परिसरात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे १७ शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पेरणी करूनही सोयाबीनची समाधानकारक उगवण न झाल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. कृषी विभागाच्या तपासणीत संबंधित बियाणे सदोष असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर 'बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीसह संबंधित व्यक्तीविरुद्ध चिमूर पोलीस ठाण्यात विविध कायद्यांअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरीप हंगामात चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने खडसंगी परिसरातील शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली होती. मात्र, पेरणीनंतर अनेक दिवस उलटूनही बियाण्यांची उगवण अत्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. त्यामुळे बियाणे, मशागत, मजुरी आणि पेरणीवरील खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी खापरी येथील मंगेश जुनघरे, खूर्सापार येथील अरुण आत्राम व दिलीप कुबडे, बोथली येथील भाऊराव दोडके, विजय देवतळे, मारोती पेटकर, राकेश कन्नाके, गोठणगाव येथील संदीप खंडाळ, सावरी बिळकर येथील संगीता निरंजने, वाहणगाव येथील पियुष थुटे, गजानन गायकवाड, भाऊराव आत्राम, ज्ञानेश्वर थुटे, सुधाकर दडमल, नरेश नैताम, दिवाकर सावसाकडे तसेच माकोना येथील विनोद धोटे अशा एकूण १७ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली होती.
तक्रारींची दखल घेत तालुका तक्रार निवारण समितीने संबंधित शेतांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. समितीने सादर केलेल्या अहवालात बियाण्यांच्या निकृष्ट दर्जामुळे पिकांचे सुमारे ८० ते ८५ टक्के नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या निष्कर्षानंतर कृषी विभागाने संबंधित कंपनीविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
तपासादरम्यान संबंधित कंपनीने बियाण्यांच्या पिशवीवर "Best Quality Guaranteed – 100% Satisfaction" असा दावा छापल्याचे आढळून आले. बियाणे नियमांनुसार अशा प्रकारची हमी किंवा दावा करणे बेकायदेशीर मानले जाते. निकृष्ट दर्जाचे बियाणे विकून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे गुण नियंत्रण कृषी अधिकारी विलास कवडू शेंडे यांच्या तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी 'बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि राहुल रामभाऊ पुरमे (रा. नंदनी, छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, बीज अधिनियम, बियाणे नियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश काशिनाथ देरकर करीत आहेत.
दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. दुबार पेरणीमुळे वाढलेला खर्च आणि उशिरा होणाऱ्या पिकाच्या वाढीचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याने शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात बीज अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संपूर्ण तपास प्रक्रिया पूर्ण करून प्रकरण न्यायालयात सादर करण्यात येईल. तसेच बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
- शिव पुजारी, तालुका कृषी अधिकारी, चिमूर