

चंद्रपूर : पूर्व वैमन्यस्यातून दोघा भावंडानी लोखंडी रॉडने मारहाण करून एका युवकाचा खून केल्याची घटना आज दुपारी शुक्रवारी राजुरा शहराला लागून असलेल्या सास्ती येथे घडली. आतिश बापू मोतकू (वय ३२) असे मृतकाचे नाव आहे. घटनेनंतर संशयित आरोपी दोघेही भावंड पसार झाले आहेत. अंकित दुम्पला व श्रावण दुम्पला असे संशयित आरोपींचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरा शहराला लागून असलेल्या सास्ती येथीली रामनगर निवासी आशिष यांचे त्याच्या भावाशी नेहमी भांडण व्हायचे. याच कारणातून त्याचेवर अटक वॉरंट काढण्यात अल्याने त्याला अटक करण्यात आली होती. तो दहा दिवस त्यामुळे तो तुरूंगात गेला होता. याच कालावधीत घराशेजारी राहणारे अंकित दुम्पला व श्रावण दुम्पला यांनी, त्याचे भावाजवळ आशीष नेहमी भांडण करीत असल्याचे त्याचे भावाला सांगितले होते. भाऊ तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याला या ठिकाणी न राहता बाहेर गावी जाण्यास सांगितले. तेव्हा आशिष हा तेलंगना मधील रामकुंड येथे आपल्या परिवारासह येथे राहू लागला. व त्याच ठिकाणी काम करू लागला. आज शुक्रवारी काम बंद असल्याने तो रानगगर (सास्ती) येथे भावाकडे आला होता.
आशिष दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास एका देशी दारू दुकानालगतच्या गल्लीत असल्याचे दोन्ही भावंडाना माहिती झाली. त्यांनी त्या गल्लीत त्याचा पाठलाग केला. त्याने जीव वाचवित पळ काढला. गल्लीत पळण्यास जागा नसल्याने आरोपीच्या तावडीत तो सापडला. दोघा भावांनी लोखंडी रॉडने त्याचेवर वार केले. यामध्ये आशिष याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच राजुरा प्रभारी पोलिस निरीक्षक (आयपीएस) अनिकेत हीरडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने लगेच दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे परिस्थिती निवळली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनाम्यानंतर उत्तरीय तपासणीकरिता राजुरा येथे पाठविले. घटनास्थळी उपजिल्हा पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल कचोरे उपस्थित होते. घटनेनंतर आरोपी भावंडे पसार झाले आहेत. वृत्त लिहिपर्यंत आरोपींना अटक झालेली नव्हती.
सदर घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे सांगितले जात आहे. सास्ती या गावाला पूर्णपणे वेकोलीने घेरले असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैद्य व्यवसाय चालतात. यापूर्वी बरेचदा अवैद्य व्यवसायातून मारपिठीच्या घटना घडल्या. राजुरा शहरात अवैद्य व्यवसायातून गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहे. सास्ती येथे घटना घडली त्याच्या दोनशे मीटर अंतरावर पोलिस चौकी आहे. घटना स्थळाला लागूनच देशी दारू दुकान व बिअर बार असून याठिकाणी नेहमी वर्दळ असते. आज याच ठिकाणी पुन्हा एक घटना घडली. सास्ती व राजुरा येथे दिवसागणिक गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढत होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.