

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहराच्या मध्यवर्ती भागात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १० लाख २४ हजार रुपये रोख आणि ४२ तोळे सोने असा लाखोंचा ऐवज लंपास केला. गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली. साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी बँकेच्या लॉकरमधून घरी आणलेले सोने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लक्ष्य केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. वरोरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून, अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही.
वरोरा शहरातील मध्यवर्ती भागात करीमजी मोहम्मद अली सन्स हे हार्डवेअरचे दुकान आहे. या दुकानाचे मालक अजगर बोहरा आणि शब्बीर बोहरा हे दोघे भाऊ शिवाजी वार्डात त्यांचे निवासस्थान आहे. दोघेही १ नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांसह मुंबई येथे गुरु महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, घरात साक्षगंधाचा कार्यक्रम नियोजित असल्याने त्यापूर्वी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने घरी आणून ठेवण्यात आले होते.
5 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास बोहरा बंधू वर्धा मार्गे वरोरा येथे घरी परतले. त्यावेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर एका खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच, त्या खोलीतील लोखंडी कपाट तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्याच खोलीत लोखंडी रॉड आढळून आला आहे. त्याच रॉडने कपाट फोडून १० लाख २४ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ४२ तोळे सोने गायब असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच बोहरा बंधूंनी वरोरा पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
एकाच खोलीतील कपाट फोडल्याने संशय
या घटनेत चोरट्यांनी घरातील केवळ एका खोलीतील कपाट फोडून रोख रक्कम आणि सोने लंपास केले. अन्य खोल्यांमधील कपाटे किंवा सामानाची तोडफोड करण्यात आलेली नाही. त्यामुळे चोरट्यांना घरातील मौल्यवान वस्तू ठेवलेल्या ठिकाणाची माहिती असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या चोरीत एकापेक्षा अधिक आरोपींचा सहभाग असण्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
कुटुंबीय चार दिवस घराबाहेर असल्याची संधी साधून चोरट्यांनी डाव साधल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येत आहे. पोलिसांनी घरासह परिसरात शोधमोहीम राबवली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वृत्त लिहिपर्यंत आरोपींचा शोध लागलेला नव्हता. या धाडसी चोरीमुळे वरोरा शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.