

Gadchandur Korpana highway blockade
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज (दि.24) सकाळपासून गडचांदूर-कोरपना राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत तीव्र चक्का जाम आंदोलन केले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
आज गुरूवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी कोरपना तालुक्यातील गडचांदूर-कोरपना राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या दिला. आंदोलनामुळे सुमारे दोन तास महामार्ग बंद होता. या काळात खासगी वाहनांपासून ते मालवाहतुकीचे वाहने अडकून राहिले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलकांशी चर्चा करून मध्यस्थी केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. त्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत झाली.
या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनासह नागरिकांमध्येही हालचाल सुरू झाली असून, शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यानिमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे.