

Chandrapur Police Crackdown
चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह परिसरात चोरी, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न, जाळपोळ अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार संगम संभाजी सागोरे याच्यावर अखेर एमपीडीए कायदा अंतर्गत कठोर कारवाई करत त्यास १ वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न, आर्म्स अॅक्ट, जाळपोळ, शिवीगाळ अशा गंभीर स्वरुपाचे तब्बल २१ गुन्हे दाखल असलेल्या संगम संभाजी सागोरे (वय ३०, रा. मित्र नगर, आंबेडकर कॉलेज जवळ, चंद्रपूर) या सराईत गुन्हेगाराने चंद्रपूर शहरासह बल्लारशा, रामनगर, पडोली, भद्रावती परिसरात गुन्हेगारीचा सुळसुळाट करून सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. पोलिसांकडून वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी वर्तणुकीत कोणताही बदल झालेला नव्हता. परिणामी, पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधक गुन्हेगारी कायदा (MPDA) अंतर्गत प्रस्ताव जिल्हाधिकारी विनय गौडा यांचेकडे सादर केला.
पोलिसांनी वेळोवेळी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाया करूनही त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमध्ये बदल न झाल्याने, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिनांक ३० जून २०२५ रोजी सदर आदेश जारी केला. सदर आदेशानुसार त्यास मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, सहायक पोलीस अधीक्षक नयोमी साटम (वरोरा), पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थागुशा, चंद्रपूर), तसेच रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसीफराजा शेख, पोलीस उपनिरीक्षक उपरे, अनिल जमकातन, योगेश खरसान, व अरुण यांचा मोलाचा सहभाग होता.