

Pathri farmer killed
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वन परीक्षेत्रातील पाथरी शिवारात आज (दि.4) सकाळी वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पांडुरंग भिकाजी चचाने (वय 65, रा. पाथरी) असे मृताचे नाव आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथरी गावातील शेतकरी पांडुरंग भिकाजी चचाने हे आज सकाळी शेतात धान पिकातील निंदनाचे काम करण्यासाठी गेले होते. निंदनाचे काम करीत असताना लगतच्या वनक्षेत्रात दडून बसलेल्या वाघाने अचानक शेतकऱ्यावर हल्ला चढवला. हल्ला इतका झपाट्याने झाला की पांडुरंग चचाने यांना सावरता आले नाही व त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी लगतच्या शेतात मजूर काम करत होते. ही घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. मजुरांच्या आवाजाने वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पाथरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, या परिसरात वाघिणीने अलीकडेच पिलांना जन्म दिल्याची माहिती मिळत असून, त्यामुळे या भागात वाघाचा वावर वाढल्याचे बोलले जात आहे. ऐन शेती हंगामात अशा घटना घडल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते ईश्वर गंडाटे यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. "शेतकरी शेतात काम करण्यासही घाबरत आहेत, त्यामुळे वन विभागाने तातडीने कारवाई करावी," असे त्यांनी म्हटले आहे. वन विभागाने मात्र शेतकऱ्यांना काळजीपूर्वक शेतात काम करण्याचे आवाहन केले असून, वाघाच्या हालचालीवर वनविभागाने लक्ष केंद्रीत केले आहे.