

चंद्रपूर : फेसबुक रिल्सवरील आकर्षक गुंतवणूक जाहिरातीच्या आमिषाला बळी पडून वरोरा तालुक्यातील एका निवृत्त मुख्याध्यापकाची 9 लाख 46 हजार 220 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात सायबर ठगांविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डा (ता. वरोरा) येथील रहिवासी बलवंत घडले यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, ऑक्टोबर 2025 मध्ये फेसबुक रिल्स पाहत असताना त्यांना मोठ्या परताव्याचे आश्वासन देणारी जाहिरात दिसली. संबंधित लिंकवर वैयक्तिक माहिती भरल्यानंतर स्वतःला "अयान प्रणव" असे सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला.
सुरुवातीला सदस्यत्व शुल्काच्या नावाखाली 22,020 रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर अधिक नफा मिळणार असल्याचे सांगून विविध टप्प्यांमध्ये 44,200 रुपये तसेच 8 लाख 80 हजार रुपये आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास भाग पाडण्यात आले.
फसवणूक करणाऱ्यांनी '9 Pro' या ऍप गुंतवणूक आणि वाढता नफा दाखवून विश्वास संपादन केला. मात्र नोव्हेंबर 2025 मध्ये गुंतवणुकीची रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच व्यवहार अयशस्वी झाला. त्यानंतर खात्यातील संपूर्ण शिल्लक शून्य दाखविण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
यानंतर त्यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदविली. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर वरोरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66(C) व 66(D) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सायबर फसवणुकीचा पुढील तपास सुरू आहे.
सायबर तज्ज्ञांनी नागरिकांना सोशल मीडियावरील जास्त परताव्याचे आश्वासन देणाऱ्या जाहिरातींवर विश्वास न ठेवण्याचे, कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची पडताळणी करण्याचे आणि संशयास्पद लिंकवर वैयक्तिक माहिती न भरण्याचे आवाहन केले आहे