Chandrapur Crime: कुख्यात दारू विक्रेता महिनाभरासाठी जिल्ह्यातून तडीपार

मस्कऱ्या गणपती व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोठारी पोलिसांची कारवाई; सहा गुन्हे दाखल
तडीपार
तडीपारPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : आगामी मस्कऱ्या गणपती उत्सव तसेच दुर्गा व शारदा नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोठारी पोलिसांनी एका दारू विक्रेत्यावर तडीपारीची कारवाई केली आहे. मनोज देवराव चांदेकर (वय ४५, रा. परसोडी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर) याच्यावर विविध सहा गुन्हे दाखल असून, वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांच्या आदेशानुसार चांदेकर याला एक महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

कोठारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी मस्कऱ्या गणपती उत्सव तसेच दुर्गा व शारदा नवरात्रोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत मनोज चांदेकर याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदेकर याच्यावर कोठारी पोलीस ठाण्यात दारू विक्रीसह एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कथित गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्याच्या कारवाया सुरू राहिल्याने पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार केला.

कोठारीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार यांनी पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय प्रस्ताव तयार करून तो उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांच्याकडे सादर केला. प्रस्तावाची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी मनोज चांदेकर याला एक महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी त्याची हद्दपारी केली. ही कारवाई कोठारीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र इंगळे, पोलीस अंमलदार हिवाराज सातपुते, गणेश देठे तसेच गुन्हे शाखा, चंद्रपूरचे सहायक फौजदार अरुण खारकर आणि परवेज शेख यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news