Chandrapur News : रेल्वे प्रवासात प्रसूतीकळा अन् महिलेने ट्रेनमध्येच दिला बाळाला जन्म; नागभीडजवळ चेन्नई–बिलासपूर एक्स्प्रेसमध्ये घटना

Chandrapur News : रेल्वे प्रवासात प्रसूतीकळा अन् महिलेने ट्रेनमध्येच दिला बाळाला जन्म; नागभीडजवळ चेन्नई–बिलासपूर एक्स्प्रेसमध्ये घटना
Published on
Updated on

चंद्रपूर : चेन्नई ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या चेन्नई–बिलासपूर एक्सप्रेस (क्रमांक 12852) मध्ये प्रवास करत असताना एका प्रवासी महिलेची नागभीडजवळ अचानक प्रसूती झाली. प्रवासादरम्यान सकाळी सुमारे 6.30 वाजताच्या सुमारास प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर ट्रेनमध्येच महिलेने बाळाला जन्म दिला. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये खळबळ उडाली असली तरी रेल्वे पोलीस, प्रवासी आणि कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे आई व नवजात बाळ दोघेही सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ललिता महेश साहू असे या प्रवासी महिलेचे नाव असून त्या पती महेश साहू यांच्यासोबत चेन्नई–बिलासपूर एक्सप्रेसने प्रवास करीत होत्या. ट्रेन नागभीडच्या जवळ येत असतानाच ललिता साहू यांना अचानक तीव्र प्रसूतीकळा सुरू झाल्या. रेल्वेत वैद्यकीय सुविधा नसतानाही उपस्थित प्रवासी व कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखत मदत केली.

प्रसूतीनंतर ट्रेन नागभीड रेल्वे स्थानकावर थांबताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत महिला व नवजात बाळाला खाली उतरवले. त्यानंतर महिलेचा पती महेश साहू यांच्या सहकार्याने आई-बाळाला नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आई-बाळ दोघेही सुखरूप

नागभीड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसूतीनंतर महिला व नवजात बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून दोघांची प्रकृती स्थिर व समाधानकारक आहे. योग्य उपचार व देखरेखीखाली दोघेही सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अचानक घडलेल्या या घटनेत रेल्वे पोलीस, प्रवासी आणि कुटुंबीयांनी दाखवलेली तत्परता व सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवासातच मातृत्वाचा आनंद लाभलेली ही घटना नागभीड परिसरात चर्चेचा विषय ठरली असून मानवी संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारी ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news