Chandrapur News | WCL कंत्राटी कामगाराच्या मृत्यूनंतर संताप; 35.43 लाखांची मदत, नोकरीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

कामावर असताना इलेक्ट्रिक पोलवरून पडल्याने गंभीर जखमी, 13 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू
Chandrapur News
Chandrapur News
Published on
Updated on

चंद्रपूर : WCL अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर बल्लारपूर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. मृतकाच्या कुटुंबीयांसह कामगारांनी WCL सब एरिया कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन छेडले. अखेर प्रशासन आणि संबंधित कंत्राटी कंपनीसोबत झालेल्या चर्चेनंतर मृतकाच्या कुटुंबाला 35 लाख 43 हजार रुपयांची आर्थिक मदत आणि मुलाला कंत्राटी नोकरी देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

WCL अंतर्गत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेले रामपूर येथील प्रकाश मोहरे (वय 45) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. मिळालेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी कामावर असताना प्रकाश मोहरे हे इलेक्ट्रिक पोलवर काम करत होते. यावेळी अचानक तोल जाऊन ते पोलवरून खाली पडले. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, जवळपास 13 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकाश मोहरे यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय आणि सहकारी कामगारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. संतप्त कामगार आणि नातेवाईकांनी बल्लारपूर येथील WCL सब एरिया कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन सुरू केले. यावेळी मृतकाच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत, कुटुंबातील सदस्याला नोकरी तसेच न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन WCL प्रशासन आणि संबंधित कंत्राटी कंपनीच्या प्रतिनिधींनी आंदोलकांसोबत चर्चा केली. दीर्घ चर्चेनंतर मृतकाच्या कुटुंबीयांना एकूण 35 लाख 43 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मृतक प्रकाश मोहरे यांच्या मुलाला कंत्राटी कामगार म्हणून नोकरी देण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले. प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर कुटुंबीय आणि कामगारांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे परिसरातील तणावपूर्ण वातावरण निवळले असून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news