

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात आज आदिवासी समाजाच्यावतीने घेतलेल्या भव्य जनआक्रोश मोर्चाने संपूर्ण शहर ढवळून निघाले. बंजारा व इतर समाजाने आदिवासी आरक्षणावर दावा ठोकण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात हजारो आदिवासी बांधव, महिला व युवकांनी एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली. “आरक्षण हा आमचा घटनादत्त हक्क आहे, त्यावर कुणाच्याही हस्तक्षेपाला आम्ही थारा देणार नाही,” असा ठाम इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना चंद्रपूर शहर आज आदिवासी बांधवांच्या घोषणांनी दुमदुमले. बंजारा व इतर समाजाने अनुसूचित जमातींच्या (ST) आरक्षणात समावेश करण्याची मागणी केल्याच्या निषेधार्थ आदिवासी समाजाच्या वतीने चंद्रपूर येथे भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या मोर्चात जिल्हाभरातून हजारो आदिवासी बांधव, महिला, युवक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. पारंपरिक पोशाख, झेंडे, फलक आणि घोषणांनी सजलेल्या या मोर्च्याने शहरातील प्रमुख मार्गांवरून संचलन केले. “जय आदिवासी, आरक्षण आमचा हक्क आहे”, “घुसखोरांना आरक्षणात स्थान नाही”, “संविधानाचा अपमान सहन करणार नाही” अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला आपला निषेध नोंदवला.
मोर्चाचे नेतृत्व विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले. या वेळी नेत्यांनी आपापल्या भाषणातून स्पष्ट संदेश दिला की, “आदिवासी समाजाने आपला हक्क संघर्षातून मिळवला आहे. तो कोणत्याही राजकीय दबावाने किंवा मागणीने हिरावून घेता येणार नाही. जो कोणी या हक्कावर डल्ला मारेल, त्याला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.”
मोर्चाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. निवेदनात राज्य शासनाने आदिवासी आरक्षणात कोणत्याही नवीन समाजाचा समावेश न करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या संदर्भात राज्य शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशीही मागणी करण्यात आली.
मोर्चा शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला असला तरी नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढविली होती. मोर्च्यात विविध आदिवासी संघटना, विद्यार्थी संघटना, महिला मंडळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. आदिवासी समाजाच्या एकतेचा आणि संघटीत शक्तीचा प्रत्यय आज चंद्रपूरकरांना आला.
या मोर्चातून आदिवासी समाजाने शासन व इतर समाजांना ठोस संदेश दिला की — “संविधानाने दिलेल्या हक्कांवर कुणीही गदा आणू शकत नाही.” आरक्षण हा आदिवासींचा जन्मसिद्ध व घटनादत्त अधिकार आहे आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व लोकशाही मार्गांनी लढा दिला जाईल, असा निर्धारही या मोर्च्यातून व्यक्त करण्यात आला.