

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील गोविंदपूर गावालगत असलेल्या देवखरा जंगल परिसरात आज रविवारी (दि.८) दुपारी बारा वाजताच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्ल्यात गणेश वासुदेव नेवारे (वय ४०) हे जखमी झाले. सुदैवाने नागरिकांच्या आरडाओरडीमुळे वाघ पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला असून जखमी इसमावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोविंदपूर गावालगत छोटेखानी जंगल परिसर असून या भागाला स्थानिक भाषेत ‘देवखरा’ असे संबोधले जाते. कालपासूनच या परिसरात वाघाचा वावर असल्याची चर्चा गावात सुरू होती. आज दुपारी काही नागरिकांना वाघ असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर दहा ते पंधरा जणांचा समूह वाघ पाहण्यासाठी गावालगतच्या देवखरा जंगलाच्या दिशेने गेला होता. याच वेळी गणेश नेवारे हे इतर नागरिकांना वाघ दाखवत असतानाच अचानक वाघाने समूहावरच पाठलाग सुरू केला. वाघाने थेट गणेश नेवारे यांच्यावर हल्ला केला. नेवारे अचानक खाली पडल्याने वाघाने पंजाने त्यांच्या पाठीवर व पायावर जोरदार वार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
नागरिकांनी जोरजोरात आरडाओरड केल्यानंतर वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या गणेश नेवारे यांना तातडीने स्थानिक स्तरावर प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागभीड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने नशीब बलवत्तर ठरल्याने त्यांचा जीव वाचला असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून परिसराची पाहणी सुरू आहे. गावालगत वाघाने मुक्काम ठोकल्याने गोविंदपूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी जंगल परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.