

चंद्रपूर : तळोधी बा. गावात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे अखेर एका निष्पाप चिमुकलीला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून तळोधी बा. गावात बेवारस व पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. गावातील रस्त्यांवर मुक्तपणे फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकदा तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील सहा जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. यात महेश रमेश मोहूर्ले (२८), रुद्रानी स्वप्निल कामडी (८), अबोली संजय पाकमोडे (६), जागृती जितेश दडमल (४) आणि रंजना हेमंत पाकमोडे (३६) यांचा समावेश होता. जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, तळोधी बा. येथे दाखल करून रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली होती. त्या वेळीही नागरिकांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिले होते, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी बाम्हणी वॉर्डात राहणाऱ्या चार वर्षीय कु. नायरा संतोष नंदनवार हिला पिसाळलेल्या कुत्र्याने गालावर चावा घेतला. गंभीर जखमी अवस्थेत तिला प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि नंतर ब्रम्हपुरी येथील खाजगी ‘आस्था हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही दिवसांनी तिला घरी सोडण्यात आले, मात्र तिची प्रकृती सतत खालावत गेली.
अखेर ११ एप्रिल २०२६ रोजी या निष्पाप चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामस्थांच्या मते, वारंवार सूचना व निवेदन देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने मोकाट व पाळीव कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. परिणामी, आज एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला.
या घटनेनंतर संतप्त महिला व पुरुष ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देऊन सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसेच पाळीव कुत्रे घरात बांधून ठेवण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सरपंच मस्के यांना निवेदन देताना विजय निपाणे, भुमराज पाकमोडे, प्रमोद पाकमोडे, जिवेश सयाम, नरेंद्र खोब्रागडे यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.