

चंद्रपूर : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाविरुद्ध लोकसभा अध्यक्षांकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे. २० एप्रिल २०२६ रोजी आयोजित 'राजमाता राणी हिराई जन्मोत्सव' या शासकीय कार्यक्रमात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्य शिष्टाचाराच्या (प्रोटोकॉल) सर्व नियमांना धाब्यावर बसवून एका महिला खासदाराचा आणि संसदेच्या प्रतिष्ठेचा जाणीवपूर्वक अवमान केल्याचा आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला आहे.
या कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या 'ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स'नुसार खासदारांचा दर्जा व भाषण क्रम निश्चित असतानाही, प्रशासनाने कमालीचा पक्षपातीपणा दाखवला. खासदार महोदयांचे भाषण सुरू असतानाच एका आमदाराला जाणीवपूर्वक वाजत-गाजत मंचावर आणले गेले, ज्यामुळे गोंधळ निर्माण होऊन खासदारांना आपले भाषण मध्येच थांबवावे लागले. हा प्रकार केवळ तांत्रिक चूक नसून एका लोकप्रतिनिधीला सार्वजनिकरीत्या अपमानित करण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांसह संबंधित यंत्रणेने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम केल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिकेत नाव नसलेल्या आणि कोणतेही घटनात्मक पद धारण न करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचा मंचावरील वावर आणि हस्तक्षेपामुळे, शासकीय निधीतून होणाऱ्या या सोहळ्याचे रूपांतर एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या खाजगी मेळाव्यात करण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हा वर्तनप्रकार संसदेच्या लोकशाही मूल्यांवर थेट आघात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन हे प्रकरण तातडीने संसदेच्या 'विशेषाधिकार समिती'कडे वर्ग करण्याची आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या आणि शिष्टाचाराचे उल्लंघन करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर दंडात्मक व सेवाशर्तींनुसार कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि संसदेच्या सर्वोच्च प्रतिष्ठेचे रक्षण होईल, असे त्यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे.