

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे सर्पदंशामुळे २९ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. विशेष म्हणजे मातृदिनाच्या दिवशीच दोन लहान मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
श्वेता संदीप श्रीरामे (वय २९) मूळ रा. घोडाझरी, हल्ली मुक्काम खडसंगी) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्या घरगुती कामात व्यस्त होत्या. यावेळी गवाऱ्या जातीच्या विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला. सापाने हाताला घट्ट पकडल्याने घरातील सदस्य आणि परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर नागरिकांनी तातडीने श्वेता यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक बनल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. नागपूरकडे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे श्रीरामे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोन लहान मुलांनी मातृदिनाच्याच दिवशी आपल्या आईला गमावल्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत.