Chandrapur News : एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Court News
Court NewsPudhari
Published on
Updated on

चंद्रपूर : एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून २७ वर्षीय तरुणीचा घरात घुसून गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीला चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रत्यक्षदर्शी साक्ष, घटनास्थळावरील रक्ताळलेला चाकू आणि डीएनए अहवालाच्या भक्कम वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली.

चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती आय. ए. शेख यांनी आरोपी विवेक ब्रह्मदास चौधरी (वय २९) याला जन्मठेप आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

मृत तरुणीचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. मात्र पतीसोबत मतभेद झाल्याने ती एप्रिल २०२१ पासून नागभीड येथे आपल्या आईकडे राहत होती. आरोपी विवेक चौधरी हा तिच्या पतीच्या शेजारी राहत असून तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने वारंवार लग्नासाठी दबाव टाकत नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

१४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपीने तरुणीच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करून तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यावेळी घरात परतलेल्या आईने आरोपीला तरुणीचा गळा चिरताना प्रत्यक्ष पाहिले. आईच्या आरडाओरडीनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी तपास करून न्यायालयात भक्कम पुराव्यानिशी दोषारोपपत्र दाखल केले. विशेष सरकारी वकील श्रीमती एस. बी. रामटेके यांनी सरकार पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासले. आरोपीच्या कपड्यांवरील आणि जप्त करण्यात आलेल्या चाकूवरील रक्ताचे नमुने मृत तरुणीच्या रक्ताशी डीएनए चाचणीत जुळल्याने हा पुरावा निर्णायक ठरला.

न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ४५०, ३५४-डी आणि ५०६ (भाग-२) अंतर्गत दोषी ठरवत विविध शिक्षा सुनावल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news